खरवंडीत तरुणावर चाकूने सपासप वार; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू..

खरवंडीत तरुणावर चाकूने सपासप वार; 

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू..


(अहिल्यानगर । प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


गणेशोत्सवानिमित्त आयोजित आरस कार्यक्रम पाहून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणावर धारदार चाकूने गळ्यावर व छातीवर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना खरवंडी (ता. पाथर्डी) येथे गुरुवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. भाऊसाहेब काकासाहेब जायगुडे (वय 28) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी आकाश नामदेव ढगे यांच्या फिर्यादीवरून रमेश आनंदा बोरुडे याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, हल्ल्‌‍यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
खरवंडी येथील मारुती मंदिराजवळ गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी रात्री गणेश मंडळाच्या वतीने आरस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास आकाश ढगे हे कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यांचे आतेभाऊ भाऊसाहेब जायगुडे हेही त्यावेळी तेथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास जायगुडे हे लघुशंकेसाठी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत गेले.

दरम्यान, काही वेळाने रमेश बोरुडे हा मंदिराच्या मागील बाजूने गणेश मंडळाच्या ठिकाणी आला. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग, हातात रक्ताने माखलेला चाकू असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्याने भाऊसाहेब जायगुडे यांना चाकूने जखमी केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यानंतर आकाश ढगे व इतरांनी मंदिराच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता भाऊसाहेब जायगुडे हे गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने उचलून घरासमोर आणण्यात आले. गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने खोल वार झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने नातेवाइक व मित्रांनी त्यांना तातडीने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जायगुडे यांची प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. सध्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रेवननाथ दहिफळे तसेच बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, निलेश गुंड व इजाज सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित रमेश आनंदा बोरुडे याला ताब्यात घेण्यात आले.



हल्ल्याचे नेमके कारण काय?
भाऊसाहेब जायगुडे यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्य, वाद किंवा अन्य काही कारणातून हा हल्ला झाला का, याचा तपास पाथर्डी पोलिसांकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे खरवंडी परिसरात खळबळ उडाली आहे
Previous Post Next Post