JEE Main आणि बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचा क्लॅश ! २१ ते ३० जानेवारीत दोन्ही परीक्षा एकाच वेळी; शहाद्यासह राज्यभरातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, वेळापत्रक बदलण्याची मागणी..

JEE Main आणि बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचा क्लॅश ! २१ ते ३० जानेवारीत दोन्ही परीक्षा एकाच वेळी; शहाद्यासह राज्यभरातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, वेळापत्रक बदलण्याची मागणी..

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील 

शहादा : बारावी विज्ञान शाखेनंतर तंत्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या JEE Main सत्र-1 आणि राज्य मंडळाच्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा कालावधी एकाच वेळी आल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दोन वर्षांपासून जीवाचे रान करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता कोणती परीक्षा द्यायची, असा पेच प्रसंग उभा ठाकला आहे. त्यामुळे राज्य मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांच्या नियोजनात बदल करावा, अशी जोरदार मागणी पालक आणि शिक्षक वर्गाकडून होत आहे.

दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरणार ?
बारावी विज्ञाननंतर अभियांत्रिकी (IIT आणि इतर नामांकित महाविद्यालये) प्रवेशासाठी JEE Main आणि वैद्यकीय प्रवेशासाठी NEET या परीक्षा NTA मार्फत घेतल्या जातात. NEET परीक्षा बारावी नंतर होत असल्याने अडचण येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून JEE Main दोन सत्रात घेतली जाते- सत्र-1 बारावीपूर्वी आणि सत्र-2 बारावी नंतर.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रचंड चुरस असल्याने पालक आपल्या पाल्याला ११वी पासूनच किंबहुना १०वी परीक्षा संपताच या परीक्षांच्या तयारीला लावतात.

वेळापत्रकात नेमका गोंधळ:
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी २०२७च्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार-
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन : २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७
तर लेखी परीक्षा : ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७

तर दुसरीकडे NTAने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार JEE Main सत्र-1 ची परीक्षा २१ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणार आहे. 
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार, JEE Main 2027 सत्र 1 परीक्षा 22, 23, 24, 28, 29 आणि 30 जानेवारी 2027 रोजी होणार असून, 31 जानेवारी हा बफर दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, दोन्ही परीक्षांचा कालावधी २१ ते ३० जानेवारी या १० दिवसांत एकमेकांवर आला आहे. बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेला ३०-७० किंवा २०-८० अशी गुण विभागणी असल्याने त्यांना या दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे JEE Main सत्र 1 देणाऱ्या विद्यार्थ्याला या परीक्षेला मुकावे लागणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही हाच गोंधळ कायम राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शिक्षणतज्ज्ञांची प्रतिक्रिया:
यासंदर्भात बोलताना हित बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे शैक्षणिक समन्वयक तथा माजी उपप्राचार्य प्रा. डी. सी. पाटील म्हणाले, “विद्यार्थी जवळपास दोन वर्षांपासून दोन्ही परीक्षांची तयारी करत आहेत. वेळापत्रकाच्या गोंधळामुळे त्यांना दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेसाठी तडजोड करायला भाग पाडू नये. राज्य मंडळाने परीक्षा तारखा जाहीर करण्यापूर्वी NTA सोबत समन्वय साधणे अपेक्षित होते. आतातरी विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक व मानसिक दबावाचा विचार करून एक व्यावहारिक तोडगा काढला पाहिजे.”
Previous Post Next Post