*चोपडा उप जिल्हा रुग्णालयात मृतदेह विहिरीतून काढण्यापासून तर कोरोना सेवे पर्यंत - प्रशांत पाटील उर्फ मामूंची मानवतेसाठी निस्वार्थ सेवा कायम*
(चोपडा तालुका विभागीय संपादक मन्सूर तडवी)
चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सन 2009 पासून कंत्राटी स्वच्छता सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत पुरुषोत्तम पाटील उर्फ मामू हे केवळ एक कर्मचारी नाहीत तर खऱ्या अर्थाने सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालय, चोपडा प्रशासनाने त्यांना नियमित स्वच्छता सेवक किंवा वर्ग-ड पदावर नियमानुसार नियुक्ती मिळावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्याकडे शिफारस केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी दिलेल्या पत्रानुसार, जा.क्र. उपजिरुचौ/आस्थ/श्रीप्रापाटींकसंनिव/ /2025, दि. 11/02/2025 रोजी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. श्री. पाटील हे शासन मान्य छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. नाशिक मार्फत 22/09/2023 पासून या पदावर कार्यरत आहेत.
*कोणतेही पैसे न घेता मृतदेह बाहेर काढण्याची सेवा*
प्रशांत पाटील उर्फ मामू यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, परिसरात एखादी दुर्दैवी घटना घडून एखादा मृतदेह विहिरीत, पाझर तलावात किंवा पाण्यात पडल्यास, ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ तेथे पोहोचून मृतदेह बाहेर काढतात. ही सेवा ते पूर्णपणे निःस्वार्थपणे, कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता करतात. हीच त्यांची खरी मानवसेवा आहे.
*कोरोना काळातील अतुलनीय कार्य*
इतकेच नाही तर सन 2006 पासून ते रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे पीएम करण्याचे काम देखील करत आहेत. कोरोना काळात जेव्हा नातेवाईक देखील जवळ यायला घाबरत होते, तेव्हा प्रशांत पाटील यांनी अत्यंत धाडसाने आणि सेवाभावाने अनेक कुटुंबांना आधार दिला, धीर दिला. त्यांच्या या कार्याची दखल चोपडा तालुका पत्रकार संघाने देखील घेऊन त्यांचा सत्कार केला होता.
उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा लक्षात घेता त्यांना कंत्राटी मधून नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने केली आहे.

