राजकारणाच्या बाजारात निष्ठेचा लिलाव !

राजकारणाच्या बाजारात निष्ठेचा लिलाव ! 

(प्रशांत बाफना विभागीय संपादक 8055440385)

पैशाने माणसं खरेदी करता येतात, पण ती कार्यकर्ते बनत नाहीत. पैशासाठी धावाधाव करतात, पण पैशाचा स्त्रोत आटला की, तेही आपली निष्ठा बदलतात. निष्ठेचा विचार आता पैशाच्या प्रेमापुढे निसटता झाला आहे. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. लोकशाहीत डोकी महत्त्वाची नसतात, तर मस्तकं हवी असतात. ती मस्तकं विचारांनी भरलेली असायला हवी असतात. त्यातून पक्षीय लोकशाही अधिक सशक्त बनत असते. ती आपण निर्माण करू शकलो, तरच आपल्याला लोकशाहीचा भक्कम पाया घालता येईल.

देशाची परिस्थिती सातत्याने बदलते आहे. राजकीय पक्षांची विचारधारा भिन्न असली, तरी सर्वच पक्ष आणि विविध प्रकारच्या संघटनांमधील कार्यकर्त्यांची अवस्था जवळपास सारखीच आहे. अनेक ठिकाणी कार्यरत असलेले पक्ष, संघटनांचे कायर्र्कर्ते काल जेथे होते ते आजही तेथेच आहेत. खरंतर ते जेथे होते तेथे आहेत म्हणून त्याची खंत नाही. अनेक कार्यकर्ते अत्यंत निरपेक्षतेने विचाराशी बांधिलकी स्वीकारत कार्यरत असतात. त्यांना विचारधारा महत्त्वाची असते, मात्र ज्यांच्यासाठी ही माणसं काम करतात, ती त्यांची किती दखल घेतात, हा खरा प्रश्न आहे. परवा राजकीय पक्षात पंचवीस-तीस वर्षे कार्यरत असलेला कार्यकर्ता भेटला होता. तो त्याची वेदना अत्यंत निराशेने सांगत होता, मी पक्षासाठी राबराब राबलो. प्रचारापासून तर अगदी सभांसाठी सतरंज्या उचलल्या. एक रुपयाची अपेक्षा केली नाही. पद मिळाले नाही आणि मी मागितले नाही. जसं आहे तसं सारं स्वीकारत राहिलो. मात्र, आज पक्षात ज्यांची बांधिलकी नाही अशी माणसं पदावर बसत आहेत. आज योगदान देणारे कार्यकर्तेही अवतीभोवती दिसत नाहीत. विचारांवरील निष्ठा संपल्या आहेत. पक्ष, संघटनांशी असणारी बांधिलकी संपली आहे. नेत्यांवरील विश्वास संपला आहे. नेता कधी निष्ठा सोडेल याचा भरवसा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत खर्‍या कार्यकर्त्याला कोणत्याच पक्षात अथवा संघटनेत स्थान उरलेले नाही. प्रामाणिक कार्यकर्ते मिळणार नसतील, तर लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक ठिसूळ बनत जाणार यात शंका नाही.

ही व्यवस्था अलीकडेच अशी होते आहे असे नाही, पूर्वीदेखील कमी प्रमाणात होतीच. मात्र त्याकाळी किमान नेते कायर्र्कर्त्यांचे दु:ख समजावून घेत होते. नेते दखल घेऊ कार्यकर्त्याच्या पदरात त्यागाचे मूल्य टाकत होते. आपण ज्या पदावर आहोत, त्या पदावर त्या कार्यकर्त्यामुळे आहोत ही पूर्णत: जाणीव नेत्यांच्या मनात होती. १९६८ सालच्या काँग्रेस अधिवेशनात बोलताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, कार्यकर्त्यांची अवहेलना होते आहे, ही मनाला दु:ख देणारी गोष्ट आहे. तीस-चाळीस वर्षे काँग्रेस पक्षासाठी राबणारी मंडळी आहेत. ते कोणत्याही निवडणुकीला उभे राहिले नाहीत की, त्यांनी कोणत्याही निव़डणुकीचे तिकीट मागितले नाही. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. केवळ विचार आणि चांगल्या माणसांसाठी कार्यकर्ते म्हणून राबत असतात. त्यांची अपेक्षा असते, आपण ज्यांच्यासाठी काम केले आहे, ती माणसं सत्तास्थानी बसली आहेत, त्याचाही त्यांना आनंद असतो. ती माणसं आली की, त्यांनी आपल्याला ओळखावे. आपली साधी चौकशी करावी. यापेक्षा त्यांना काहीच नको असते.

अर्थात कधी काळी नेतेदेखील आपल्या अवतीभोवती लाभार्थी गोळा करण्याऐवजी खर्‍या कार्यकर्त्यांच्या शोधात असायचे. नेतृत्त्वाला देखील विचारांवर प्रेम असणारे कार्यकर्ते ओळखता यायचे. आपण आहोत, ते प्रामाणिक कायर्र्कर्त्यामुळे ही जाणीव त्यांना होती. त्यामुळे योग्यवेळी अशा निस्सीम प्रेम असलेल्या कार्यकर्त्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न व्हायचा. १९९५ ला राज्यात शिवसेनेचे सत्ती आली होती. तेव्हा सत्तेच्या खुर्चीवर कोणाकोणाला बसवायचे याविषयी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. कोणाला पदे द्यायची यावर चर्चा सुरू होती. त्या बैठकीला दादा कोंडकेदेखील उपस्थित होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, दादा तुम्हाला कोणते पद हवं ते सांगा…? तेव्हा शिवसेनाप्रमुख असलेल्या बाळासाहेब ठाकरेंना दादा म्हणाले, तुम्ही कोणते पद घेणार आहात?  ते सांगा. हा प्रश्न ऐकल्यावर ठाकरे म्हणाले की, मी शिवसेनाप्रमुख पदावर राहाणार आहे. त्यापेक्षा वेगळ्या पदाची सत्ता मला नको, तेव्हा दादा त्यांना म्हणाले की, मलाही शिवसैनिक याच पदावर राहायचे आहे. त्यापेक्षा कोणतेही पद मोठे नाही. ते कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. दुसरे कोणतेही पद नको. एक काळ देशातील सर्व पक्षात असे नेते आणि कार्यकर्ते होते.

आपल्याला सत्तेचे स्थान नको, असे सांगत होते. प्रामाणिकपणाने पक्ष, संघटनेसाठी लढत होते. त्याच्यासाठी सत्तेची खुर्ची देणारी माणसं होती. आज या दोन्ही माणसाची वानवा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला फक्त सत्तेची खुर्ची हवी आहे. त्यापलीकडे विचार करणे थांबले आहे. जो सत्तेची खुर्ची देणार नाही, त्या पक्षाचा त्याग केला जाऊ लागला आहे. मग एका दिवसात अशा चार विचारांच्या पक्षांचा त्याग करायची वेळ आली तरी चालेल, पण सत्ता मिळायला हवी. अशा नेते आणि कार्यकर्त्यांचा भरणा वाढला की फक्त गर्दी होते, पण त्याने ना नेता मोठा होत, ना पक्ष, ना संघटना मोठी होते. कायर्र्कर्ते विचारशून्य होतात. पक्ष, संघटना अधिक दुर्बल बनत जाते. त्यामुळे नुकसान कार्यकर्ते, नेत्यांचे किती होते, यापेक्षा अधिकाधिक नुकसान समाज आणि राष्ट्राचे होते. स्वातंत्र्यांनतर आपण विचारांवर प्रेम करणारी माणसं निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत. विचारशून्यतेमुळे माणसं बाजारात उभी राहिल्यासारखी पक्ष, संघटनेत काम करत आहेत. बाजारात फक्त गोंधळ असतो. त्यापलीकडे तेथे काहीच नसते, त्याप्रमाणे येथील पक्ष, संघटनेत फक्त गर्दी असते आणि सोबत विचारशून्यता.

लोकशाही आपल्याला भक्कम करायची असेल, तर लोकशाहीसाठी अधिक चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. मुळात लोकशाहीमध्ये स्वत:ची महत्त्वाकांक्षा घेऊन प्रवास सुरू केला, तर त्यातून काही मिळेल, पण समाज व राष्ट्राच्या पदरात फार काही पडत नाही. दादा कोंडके यांनी आपल्या जीवन चरित्रात एक गोष्ट नमूद केली आहे, ते म्हणतात की, माझा एकटेपणा, दु:ख मी फारसे कोणाला जाणवू देत नाही. मी एकटा मजेत जगतो. असं अनेकांना वाटत असेल, खरंतर या एकटेपणाच्या मोबदल्यात देवाने मला यश, पैसा, संपत्ती, प्रसिध्दी असं बरेच काही दिलं आहे. पण पुढच्या जन्मी मला देवाने पैसा, सत्ता, संपत्ती, प्रसिध्दी असं काही नाही दिले तरी चालेल, पण मला एकटेपणा मात्र देऊ नये. पैसा नसलेल्या नेत्यांना एकटेपणा जाणवू लागला आहे. खर्‍या कार्यकर्त्यांना एकटेपणा वाटू लागला आहे. पूर्वी कायर्र्कर्ते आंदोलन कोणतेही असले, तरी प्राण पणाला लावून लढत होते. नेत्याचा आदेश आहे म्हटल्यावर मागे पुढे पाहत नव्हते. आज अशा आंदोलनाला गर्दी होत नाही. आंदोलने झाली तरी ती दिखाऊच अधिक असतात. कार्यकर्ते त्यात जीव ओतत नाही, न जाणो उद्या काही झाले, तर नेते आपली बाजू घेऊन लढतील का? त्याचे उत्तर नाही असेच येते. कारण खर्‍या कार्यकर्त्यांची वानवा आहे. जेव्हा खरा कायर्र्कर्ता संपतो तेव्हा पक्ष, संघटना, विचार, आंदोलन सारेच संपलेले असते. लाभार्थी कार्यकर्ते जवळ आले की, फक्त स्वार्थाचा बाजार भरतो आणि मग ही माणसं फक्त लाभापुरते आंदोलनात उभे राहतात. लोकशाही वाचवण्याच्या घोषणा होतात. यातून आपण खरा स्वयंसेवक निर्माण करू शकणार नाही. त्यामुळे लोकशाहीच्या विकासाची प्रक्रिया घडण्याची शक्यता नाही. कार्यकर्त्यांअभावी लोकशाहीचा पाया ठिसूळ होत जाण्याचा धोका आहे. आज त्या कार्यकर्त्यांमध्ये येणार्‍या एकाकीपणामुळे उद्या राजकीय पक्षांचे अस्तित्वदेखील संपुष्टात येईल म्हणून विचार करायला
Previous Post Next Post