काळाच्या ओघात लुप्त होत चाललाय वासुदेव; लोकपरंपरेचा आवाज हरवण्याची भीती !
(अहिल्यानगर/प्रशांत बाफना विभागीय संपादक)
— पहाटेच्या प्रसन्न वातावरणात डोक्यावर मोरपिसांची आकर्षक टोपी, अंगावर पारंपरिक पोशाख, हातात टाळ किंवा चिपळ्या आणि मुखातून विठ्ठलनामाचा गजर… “दान पावलं…” म्हणत गावोगावी फिरणारा वासुदेव एकेकाळी ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. मात्र बदलत्या काळाच्या ओघात आधुनिकतेच्या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे हे पारंपरिक प्रतीक आज हळूहळू लुप्त होत चालले असल्याचे बारामती मधील मेडद गावचे वासुदेव अमित गोंडे, बाबासाहेब विधाते यांनी सांगितले.
एकेकाळी गावातील पहाट वासुदेवाच्या मधुर आवाजाने उजाडत असे. घराघरांत जाऊन देवाचे नामस्मरण, पारंपरिक गीते आणि सामाजिक संदेश देणारा वासुदेव केवळ भिक्षा मागणारा कलाकार नव्हता, तर तो लोकसंस्कृतीचा जिवंत वारसदार होता. त्याच्या वेशभूषेतील वैशिष्ट्यपूर्ण टोपी, रंगीबेरंगी पोशाख आणि पारंपरिक वाद्ये ग्रामीण जीवनाचे खास आकर्षण ठरत होते.
इतिहासातील महत्त्व
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत आणि लोकजीवनात वासुदेवाला विशेष स्थान आहे. संत साहित्यामध्येही वासुदेवाचा उल्लेख आढळतो. संतांनी आपल्या अभंग आणि भारुडांमधून सामान्य जनतेपर्यंत अध्यात्म, नैतिकता आणि सामाजिक प्रबोधन पोहोचविण्यासाठी विविध लोककलांचा आधार घेतला. वासुदेवाची भूमिका ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून लोकजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणूनही महत्त्वाची होती.
पूर्वीच्या काळात आजच्यासारखी वृत्तपत्रे, दूरदर्शन किंवा मोबाईलसारखी माहितीची साधने उपलब्ध नव्हती. अशा वेळी गावोगावी फिरणारे लोककलावंत हे सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम होते. वासुदेव आपल्या गीतांमधून धार्मिक कथा, नैतिक मूल्ये आणि समाजोपयोगी संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असे.
आधुनिकतेच्या झगमगाटात परंपरा मागे
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे पारंपरिक लोककलांकडे नव्या पिढीचे आकर्षण कमी होत असल्याचे चित्र आहे. वासुदेवाची कला शिकून ती पुढे नेण्यासाठी तरुण पिढी फारशी पुढे येत नाही. आर्थिक अस्थिरता आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक पारंपरिक कलाकारांनी हा व्यवसाय सोडून इतर उपजीविकेचे मार्ग स्वीकारले आहेत.
गावोगावी पूर्वी सहज दिसणारा वासुदेव आज क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे पुढील काही वर्षांत ही लोककला केवळ पुस्तकांपुरती आणि इतिहासाच्या पानांपुरती मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
जतनाची गरज
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीतील वासुदेव ही केवळ एक कला नसून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. शासन, सांस्कृतिक संस्था, शाळा-महाविद्यालये आणि समाजाने एकत्रितपणे या लोककलेच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोककला महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय उपक्रमांमधून वासुदेव परंपरेची ओळख नव्या पिढीला करून दिल्यास ही कला पुन्हा नवसंजीवनी घेऊ शकते.
काळ बदलला, जीवनशैली बदलली; मात्र आपल्या संस्कृतीची मुळे जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पहाटेच्या शांततेत घुमणारा वासुदेवाचा आवाज पुन्हा ऐकू यावा, यासाठी या लोकपरंपरेचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे

