ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
अहिल्यानगर ।प्रशांत बाफना
महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिकारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर होणारे हल्ले व त्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत संघटनेचे अिल्हाध्यक्ष युवराज पाटील, किशोर जेजुरकर, सुनील राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढला.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर ग्रामपंचायतीत ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गामध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई 136 राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या वतीने 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सकाळी 11 वाजता महापालिका कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय मार्गाने हा मूक मोर्चा काढला. विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना मागण्यांचे निवेदन दिले

