भद्रावतीत सरपंच पदाच्या आरक्षणाचा 'धक्का': ६९ ग्रामपंचायतींचे राजकारण ढवळले; 'दादा-भाऊं'ची गणिते कोलमडली!

भद्रावतीत सरपंच पदाच्या आरक्षणाचा 'धक्का': ६९ ग्रामपंचायतींचे राजकारण ढवळले; 'दादा-भाऊं'ची गणिते कोलमडली!


(महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपुर जिल्हा विभागीय संपादक)



भद्रावती दि. 5:-भद्रावती तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत ४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात पार पडली अन् तालुक्यातील संपूर्ण राजकीय पटच बदलून गेला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या प्रभागांवर स्थानिक दिग्गजांची नजर होती, तेथे आरक्षणाची गुगली पडल्यामुळे अनेक प्रस्थापितांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये एकाकी शांतता तर नव्या चेहऱ्यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरक्षणाचा नवा पट: कुठल्या गावात कोणती लॉटरी?
शासकीय निकष आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जाहीर झालेल्या या सोडतीने प्रभागांचे समीकरण पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे:
अनुसूचित जाती (SC):
सर्वसाधारण: बरांज मोकासा
महिला: घोडपेठ
अनुसूचित जमाती (ST):
सर्वसाधारण: सावरी, खोकरी, मानोरा सिंगरु, पावना रै, चिचोली
महिला: पळसगांव सिंगरु, चारगांव, मांगली रै, गुंजाळा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC):
सर्वसाधारण: जेना, चंदनखेडा, मोहबाळा, नागलोन, चपराळा, कोकेवाडा तुकूम, विलोडा, भटाळी
महिला: तिरवंजा मोकासा, विसापुर रै, कढोली, शेगांव खुर्द, पारोधी, घोटनिबाळा, चोरा, काटवल तुकूम
सर्वसाधारण (Open) प्रवर्ग:
महिला आरक्षित: विसलोन, मासळ विसापूर, चिरादेवी, चेकबरांज, भामढेळी, गुळगांव माल, पेवरा तुकूम, माजरी
अराखीव (खुला गट): सेलोटी वाघेडा, मनगांव, बेलगांव भुसारी, आष्टी काकडे, बिजोनी, पानवडाळा, रानतळोधी, आष्टा, देऊळवाडा, पाटाळा, पिर्ली, चालबडी कोंढा, कान्सा सिरपूर, धानोली, टाकळी, मुधोली, कोंढेगांव माल, कुचना, पिपरी, चकतिरवंजा, चालबडी रै, घोनाड, मुरसा, टेकाडी दिक्षीत, सागरा, नंदोरी बु., कोढा, गोरजा, ढोरवासा, कचराळा, वायगांव तुकूम, डोंगरगांव खडी.
दिग्गजांची 'कोंडी'; आता 'घरच्या' नेतृत्वाचाच आसरा!
वर्षभरापासून ज्या गावात मातब्बर नेत्यांनी स्वतःसाठी किंवा आपल्या खंद्या समर्थकांसाठी रान पेटवले होते, तेथे महिला आरक्षण (उदा. घोडपेठ, कढोली, शेगांव खुर्द, विसापुर रै) लागू झाल्याने पुरुष नेत्यांची थेट कोंडी झाली आहे. स्वतःची उमेदवारी हुकल्यामुळे आता घरातील महिला सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपली राजकीय पकड मजबूत ठेवण्याशिवाय या नेत्यांकडे पर्याय उरलेला नाही.
दुसरीकडे, खुल्या गटाची अपेक्षा असणाऱ्या काही प्रभागांमध्ये SC, ST किंवा OBC चे आरक्षण पडल्याने अनेक जुन्या चेहऱ्यांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आली आहे.
समर्थकांमध्ये अस्वस्थता, पण नव्या चेहऱ्यांना 'सुवर्णसंधी'
सोडतीचा कौल बाहेर येताच पंचायत समिती परिसरात जमलेल्या समर्थकांमध्ये कुठे आनंदोत्सव तर कुठे कमालीची निराशा पाहायला मिळाली. "रात्रंदिवस मेहनत करून मोर्चेबांधणी केली, पण आरक्षणाने एका फटक्यात सर्व मेहनतीवर पाणी फेरले," अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने दिली.
मात्र, या राजकीय उलथापालथीचा सर्वात मोठा फायदा तरुण रक्ताला आणि महिला नेतृत्वाला होणार आहे. ज्या गावांमध्ये वर्षानुवर्षे प्रस्थापितांचे वर्चस्व होते, तेथे आता नव्या चेहऱ्यांना ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेण्याची मोठी संधी चालून आली आहे.
आता रिमोट कंट्रोल कारभाराची तयारी?
प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरता येत नसल्याने तालुक्यातील अनेक दिग्गज आता 'पडद्यामागून' सूत्रे हलवण्याच्या तयारीत आहेत. आपल्या मर्जीतील किंवा कुटुंबातील व्यक्तीला खुर्चीवर बसवून 'रिमोट कंट्रोल'ने सत्ता चालवण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड ईर्ष्या आणि राजकीय डावपेच पाहायला मिळणार हे नक्की!
Previous Post Next Post