यावलमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम चर्चेत; महायुतीतील घटक पक्षांना डावलल्याची नाराजी,,आमदार अमोल जावळे अनुपस्थित; पत्रकारांनाही निमंत्रण नसल्याने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

यावलमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम चर्चेत; महायुतीतील घटक पक्षांना डावलल्याची नाराजी

आमदार अमोल जावळे अनुपस्थित; पत्रकारांनाही निमंत्रण नसल्याने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

(जळगाव जिल्हा विशेष| प्रतिनिधी : फिरोज तडवी)

यावल शहरातील भुसावळ टी-पॉइंटजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते कामाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. सुमारे १५ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा कार्यक्रम मात्र शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमाची माहिती व्यापकपणे न देता मोजक्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकण्यात आल्याचा आरोप होत असून, महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आल्याची चर्चा रंगली आहे.

बऱ्हाणपूर–तळोदा या दोन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावरच अनेकांना कार्यक्रमाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक विकासकामाचा कार्यक्रम की केवळ भाजपचा कार्यक्रम? असा सवालही स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.

महायुतीतील घटक पक्षांना डावलल्याची चर्चा

कार्यक्रमाला महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदार अमोल जावळे यांचीही कार्यक्रमातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा बाजार समिती संचालक बबलू कोळी यांनी, “सदर कार्यक्रमाचे आम्हाला आमंत्रण आले नव्हते,” असे सांगितले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ॲड. देवकांत पाटील यांनी सांगितले की, “ऐनवेळी आमच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्याने कार्यक्रमातून फोन करून कार्यक्रमाला येण्यास सांगितले. मात्र, ऐनवेळी कार्यक्रमाला जाणे शक्य नव्हते.”

या वक्तव्यांमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकारांमध्येही नाराजी

दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व निमंत्रणाच्या नियोजनावर स्थानिक पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली. भाजपकडून निवडणुकीच्या काळात पत्रकारांना आवर्जून कार्यक्रमांसाठी बोलावले जाते; मात्र त्यानंतर पक्षाचे विविध कार्यक्रम होत असताना पत्रकारांना निमंत्रण दिले जात नसल्याची भावना काही पत्रकारांनी व्यक्त केली.

याबाबत पत्रकारांच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असून, “सार्वजनिक विकासकामांच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्याचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गाचे काम हे सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित असून, त्याच्या भूमिपूजनासारख्या कार्यक्रमात महायुतीतील घटक पक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यमांना अपेक्षित स्थान मिळाले का, यावरून आता यावलच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकूणच, विकासकामाच्या भूमिपूजनापेक्षा कार्यक्रमाचे नियोजन, महायुतीतील समन्वयाचा अभाव आणि आमदारांच्या अनुपस्थितीने यावलच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
Previous Post Next Post