मोक्याच्या जागा धूळखात; पाथर्डीच्या सौंदर्याला पडझडलेल्या इमारतींचा डाग!
शहराचा झपाट्याने विकास सुरू; मात्र जुन्या सरकारी इमारती व जागा दुर्लक्षितच-अतिक्रमणाचाही धोका
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना विभागीय संपादक)
: पाथर्डी शहराचा झपाट्याने विस्तार आणि विकास होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक सरकारी जागा व जुन्या इमारती मात्र आजही दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. काही इमारती अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असून, काही ठिकाणी मौल्यवान साहित्य चोरीला गेले आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या पडझड झालेल्या इमारती शहराच्या सौंदर्यालाही बाधा ठरत असून, सरकारी मालमत्तेच्या वापराबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाथर्डी शहरातील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मराठी मुलांच्या शाळेची जुनी इमारत सध्या अत्यंत दुरवस्थेत आहे. इमारतीतील सागवानी लाकूड, दरवाजे आणि पत्रेही चोरीला गेल्याचे चित्र आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगात असलेली ही इमारत आज भग्नावस्थेत उभी आहे.
कसबा विभागातील मौलाना आझाद चौकातील जुना सरकारी दवाखानादेखील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या सुरू होत्या. शिक्षणासाठी वापरल्या गेलेल्या या वर्गखोल्याही आता शेवटच्या घटका मोजत असून, त्यांचा उपयोग कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
शनी मंदिराजवळील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या खोल्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. तर पोलीस खात्याच्या मालकीची चिंचपुर रोडवरील जुनी पोलीस वसाहतीची जागा वापराअभावी उध्वस्त होत चालली आहे. नाईक पुतळ्याजवळ नगर परिषदेच्या मालकीची जुनी इमारतही धूळखात पडली असून, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या मालमत्तेचा विकासासाठी उपयोग करण्याची गरज आहे.
शहराच्या सौंदर्याला बाधा
एकीकडे पाथर्डी शहरात नवीन इमारती, व्यापारी संकुले आणि विविध विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या भागात मोडकळीस आलेल्या जुन्या सरकारी इमारती आणि पडून असलेल्या जागा शहराच्या सौंदर्याला बाधा ठरत आहेत. या जागांची देखभाल न झाल्याने त्या असामाजिक कृत्यांसाठी वापरल्या जाण्याची तसेच अतिक्रमण होण्याची शक्यताही वाढत आहे.
मौल्यवान जागांचा विकास कधी?
पाथर्डी शहरातील जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत शासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग आणि नगर परिषद यांच्या मालकीच्या मोक्याच्या जागा वर्षानुवर्षे वापराविना पडून राहणे ही मोठी विसंगती आहे. या जागांचा नियोजनबद्ध विकास केल्यास व्यापारी संकुले, कार्यालये, सार्वजनिक सुविधा किंवा रोजगारनिर्मिती करणारे प्रकल्प उभारता येऊ शकतात. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच संबंधित संस्थांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. अन्यथा मतदान केंद्रांची उभारणी शक्य आहे. सरकारी मालमत्ता केवळ पडून ठेवण्याऐवजी तिचे सर्वेक्षण, संरचनात्मक परीक्षण, दुरुस्ती किंवा पुनर्विकास करण्याची गरज आहे. धोकादायक इमारतींचे योग्य मूल्यमापन करून त्यांचा पुनर्वापर किंवा पाडकाम करून त्या जागेचा नियोजनबद्ध विकास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. पाथर्डी शहराच्या बदलत्या चेहऱ्याला साजेसा विकास हवा असेल, तर मोक्याच्या सरकारी जागा आणि जुन्या इमारतींकडे होणारे दुर्लक्ष थांबवून त्यांचा तातडीने उपयोग करणे आवश्यक आहे

