*'झूठा इश्क’ अल्बमसाठी तरुण पत्रकार अश्विन बोदाडे यांचा सन्मान....!!*
* रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे बेस्ट अल्बम अवॉर्ड; इंझाळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
देवळी प्रतिनिधी :-
(रविंद्र पारीसे)
इंझाळा येथील तरुण पत्रकार, गीतकार व निर्माता अश्विन बोदाडे यांच्या ‘झूठा इश्क’ या अल्बमची रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे दखल घेण्यात आली असून, त्यांना बेस्ट अल्बम अवॉर्ड (म्युझिकल अवॉर्ड) देऊन सन्मानित करण्यात आले.
अश्विन बोदाडे यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत पत्रकारितेसोबतच कला क्षेत्रातही आपली आवड जोपासली आहे. विविध अडचणी व संकटांवर मात करत त्यांनी स्वतःच्या गीतलेखनातून ‘झूठा इश्क’ या अल्बमची निर्मिती केली. या अल्बमच्या प्रकाशनासाठी तो रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हल, संभाजीनगर येथे सादर करण्यात आला होता. यावेळी अल्बमच्या कलात्मक गुणवत्तेची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
'झूठा इश्क’ या अल्बममधील गीतांना रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, संबंधित गीते ‘उडान एक सोच’ तसेच ‘अश्विन बोदाडे’ या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरही या गीतांना रसिकांची पसंती मिळत आहे.
अश्विन बोदाडे यांचा ‘तुझ्या प्रेमाला भावपूर्ण श्रद्धांजली’ हा आगामी अल्बम लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती आहे.
या अल्बमच्या निर्मितीत गीतकार व निर्माता अश्विन बोदाडे, फोटो एडिटिंग प्रियाशु शंभरकर, व्हिडिओ एडिटिंग रोहित पाटील, तर संगीत स्वरसांज यांनी दिले आहे.
रोशनी नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे संचालक तुषार थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात देश-विदेशातील पाहुणे, फिल्म डायरेक्टर, अभिनेते व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अश्विन बोदाडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल फिल्म अभिनेता विजय कुमार खंडारे (अमरावती), फिल्म अभिनेत्री शिप्रा तेलगे (वर्धा), नव स्वराज न्यूज, युवा पत्रकार संघटना, डिजिटल पत्रकार संघटना, तसेच इंझाळा येथील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील तरुणाने पत्रकारितेसोबतच संगीत व मनोरंजन क्षेत्रात केलेली ही वाटचाल कौतुकास्पद असून, अश्विन बोदाडे यांच्या या यशामुळे इंझाळा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

