शिक्षकदिनी कलेचा अविस्मरणीय सोहळा; ‘श्री आर्ट गॅलरी’ ठरली आकर्षणाचे केंद्र...!** आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांनी कवितेतून व्यक्त केला सन्मान — गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

*शिक्षकदिनी कलेचा अविस्मरणीय सोहळा; ‘श्री आर्ट गॅलरी’ ठरली आकर्षणाचे केंद्र...!*

* आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांनी कवितेतून व्यक्त केला सन्मान — गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

(देवळी प्रतिनिधी:-
(रविंद्र पारीसे)

                 शिक्षकदिनाचे औचित्य साधून ‘श्री आर्ट गॅलरी, अमरावती’च्या वतीने आयोजित विशेष कला कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे, मुंबई तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश आमझरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
          यावेळी श्री आर्ट गॅलरीचे संस्थापक सारंग नागठाणे यांनी आमदार बच्चूभाऊ कडू आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश आमझरे यांच्या आकर्षक पेंटिंग्ज साकारल्या. कलेच्या माध्यमातून स्नेह व आदर व्यक्त करत या कलाकृती दिनेश आमझरे यांना भेट देण्यात आल्या. या अनोख्या कलासन्मानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
            कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे यांचे रांगोळी कलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ठरले. गोपाळे यांनी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार रांगोळ्या साकारल्या असून, त्यांच्या रांगोळी कलेचे प्रदर्शन स्वित्झर्लंडमध्येही झाले आहे. बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रतिमा त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या आहेत.
          महादेव गोपाळे यांच्या कलाप्रवासाचा गौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता सादर केल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेप्रती आदर व्यक्त केला. यावेळी गोपाळे यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व सांगून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांची जोपासना करण्याचे आवाहन केले.
           सारंग नागठाणे यांच्या कलाकृतींना महाराष्ट्राच्या विविध भागांतून मागणी मिळत असून त्यांच्या कलाविष्काराला कलाप्रेमींकडून प्रतिसाद मिळत आहे. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले.
            कार्यक्रमात आमदार रवी राणा यांच्या हस्ते मूर्तीकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले.
           कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित या कला सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
Previous Post Next Post