*तेलीपुरा चौकातील चाकू हल्ला प्रकरण: रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई, ३ तासांत मुख्य आरोपी गजाआड*
(अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान )
अकोला:रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलीपुरा चौकात एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अवघ्या तीन तासांत सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. सुजल सुभाष मोतकर (वय २३, रा. माळीपुरा, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या गुन्ह्यात त्याचा एक विधीसंघर्ष बालक (नाबालिक साथीदार) देखील सामील होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास तेलीपुरा चौकातील लहान जमजम हॉटेलजवळ दोन अनोळखी युवकांनी एका तरुणावर चाकूने गंभीर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबानीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५६९/२६, बीएनएस कलम १०९, ११५ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि गोपनीय बातमीदार सक्रिय करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रामदासपेठचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी गुन्हे शोध पथकाला (DB) आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले.
रेल्वे स्टेशनजवळ सिनेस्टाईल पाठलाग
तपास सुरू असतानाच, मुख्य आरोपी सुजल मोतकर हा अकोट फाईल परिसरात वावरत असून तो शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने पाळत ठेवली असता, आरोपी रेल्वे ओव्हर ब्रिजवरून दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसला. पोलिसांनी तात्काळ त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि रेल्वे स्टेशनसमोरील हनुमान मंदिराजवळ त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या अल्पवयीन साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला रितसर अटक करून हवालात बंद केले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार सुरेश लांडे, संदिप वानखडे, रोशन पटले, नितीन तेलगोटे, अमर इंगळे, जुगल डबेलकर, अभीजीत इंगळे, प्रेम नांदोकार आणि इमाम चौधरी यांनी केली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

