गणना प्रपत्रातील गावाच्या नोंदीवर आक्षेप; बागायत पातूरची स्वतंत्र मतदार यादी करण्याची मागणी.
जिरायत पातूरऐवजी बागायत पातूर अशी नोंद करण्याची प्रल्हादराव बोचरे यांची मागणी.
अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी
संतोष उपरवट
पातूर : मतदार गणना प्रपत्रामध्ये आपण वास्तव्यास असलेल्या गावाचे नाव चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आल्याचा आक्षेप घेत, बागायत पातूर (ठाकूरवाडी) येथील रहिवासी प्रल्हादराव मोतीरामजी बोचरे यांनी जिल्हा निवडणूक मतदार गणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, गणना प्रपत्र भरण्यासाठी आलेल्या प्रतिनिधी बी.एल.ओ. प्रमोद उगले यांनी प्रल्हादराव बोचरे यांच्याकडून गणना प्रपत्र भरून घेतले. या प्रपत्रामध्ये ते राहत असलेल्या गावाच्या ठिकाणी ‘२४१ जिरायत पातूर’ असे छापलेले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, आपण प्रत्यक्षात बागायत पातूर (ठाकूरवाडी) येथे राहत असून आपले घर व वास्तव्य बागायत पातूर येथेच असल्याचे बोचरे यांनी स्पष्ट केले आहे.
बोचरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण बागायत पातूर गावाचे रहिवासी मतदारांची नोंदणी चुकीने जिरायत पातूर या गावात होण्याची शक्यता आहे. बागायत पातूर व जिरायत पातूर ही पातूर तालुक्यातील स्वतंत्र गावे असून बागायत पातूर येथील मतदारांची नोंद बागायत पातूरमध्येच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, गणना प्रक्रियेत बागायत पातूर येथील रहिवाशांना जिरायत पातूर येथील रहिवासी म्हणून नोंदविल्यास गावातील नागरिकांना आपल्या रहिवासाच्या नोंदीबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या नोंदीमुळे बागायत पातूर आणि जिरायत पातूर या दोन स्वतंत्र गावांच्या मतदार नोंदी एकत्र होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, बागायत पातूर व जिरायत पातूर ही गावे वेगवेगळ्या पंचायत समिती गणात जिल्हा परिषद मतदारसंघांत येतात. त्यामुळे मतदारांची नोंद योग्य गावाच्या मतदार यादीत होणे आवश्यक आहे. बागायत पातूर येथील मतदारांची नोंद जिरायत पातूरच्या मतदार यादीत झाल्यास संबंधित मतदारांना त्यांच्या गावातील उमेदवारांना मतदान करता येणार नसल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बागायत पातूरमधील मतदारांची गणना बागायत पातूरमध्येच करून बागायत पातूरची स्वतंत्र मतदार यादी प्रसिद्ध करावी आणि बागायत पातूरच्या मतदारांची नावे जिरायत पातूरमध्ये समाविष्ट करू नयेत, अशी स्पष्ट मागणी प्रल्हादराव मोतीरामजी बोचरे यांनी केली आहे.
निवेदनासोबत आधारकार्डची 9झेरॉक्स प्रत तसेच रहिवासी असल्याचा दाखला जोडण्यात आला आहे. आता निवडणूक विभाग या निवेदनाची दखल घेऊन मतदार गणना प्रपत्रातील गावाच्या नोंदीची पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करणार का, याकडे बागायत पातूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मीडिया पोलीस टाईम.✍️
अकोला जिल्हा विभागीय प्रतिनिधी
संतोष उपरवट.✍️

