अहिल्यानगरचे डॉ. योगेश बाफना यांना दिल्ली येथे ‘फार्मा मित्र’ राष्ट्रीय पुरस्कार”
(अहिल्यानगर (प्रशांत बाफना) : विभागीय संपादक)
फार्मसी शिक्षण, संशोधन व समाजाभिमुख कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अहिल्यानगर येथील डॉ. योगेश सुरेश बाफना यांना ‘फार्मा मित्र’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान नवी दिल्ली येथे आयोजित National Pharma Summit 2026 या राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फार्मालोक (Pharmalok) संस्थेच्या वतीने २७ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय विद्या पीठ कॅम्पस, नवी दिल्ली येथे या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील प्रख्यात प्राध्यापक, संशोधक व फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या परिषदेत “Advancing Pharmacy Education & Practice: Innovation, AI & Skill Development for Contemporary Healthcare in Viksit Bharat” या विषयावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रांमध्ये फार्मसी शिक्षणातील आधुनिक प्रवाह, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा आरोग्य सेवेत वापर, विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास तसेच बदलत्या आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
डॉ. बाफना हे अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगरचे प्राचार्य असून त्यांनी गेल्या २२ वर्षांत फार्मसी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधन प्रकल्प, पेटंट्स, संशोधन निबंध तसेच विविध शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आरोग्य जनजागृतीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून विविध स्तरांतून डॉ. बाफना यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

