रावेरमध्ये नागरी वस्तीजवळ आढळला महाकाय अजगर; वन विभागाच्या मदतीने सुरक्षित जंगलात सोडला.
प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराचे प्राण वाचले; वन विभागाच्या पथकाची तत्पर कारवाई.
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर
रावेर शहरातील सावदा रोडलगत नागरी वस्तीजवळ मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. याबाबतची माहिती भाजपा कार्यकर्ते बाळा आमोदकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ दीपक नगरे यांच्या माध्यमातून वन विभागाशी संपर्क साधला.
यानंतर सर्पमित्र बाबा मन्यार यांच्या मदतीने अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी अजगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुपडू सपकाळे, शेखर चौधरी आणि विनोद पाटील यांनी आवश्यक ती कार्यवाही करत पकडलेल्या अजगराला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित असलेल्या जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडले.
प्राणीमित्र, सर्पमित्र आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरी वस्तीत आलेल्या या अजगराला कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात आले. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

