भद्रावती पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन..नीलकंठराव शिंदे महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम; ७० ते ८० विद्यार्थी सहभागी...

भद्रावती पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन..

नीलकंठराव शिंदे महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम; ७० ते ८० विद्यार्थी सहभागी...

महेश निमसटकर 
ज़िल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 


    
भद्रावती दी. 17 :-पोलीस स्टेशन भद्रावतीच्या वतीने दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी नीलकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे प्रतिबंध, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, महिला व बालसुरक्षा तसेच MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात सपोनि धोंगडे, मपोहवा सुकेशनी व पोलीस शिपाई अजित देशकर यांनी विद्यार्थ्यांना बनावट ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म, फसव्या लिंक, बँक खात्याच्या नावाखाली पाठवले जाणारे बनावट SMS व ई-मेल, UPI व्यवहारातील सुरक्षितता, आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

तसेच गुड टच-बॅड टच, पोक्सो कायदा आणि आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या हेल्पलाइनचा वापर याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी व बँकविषयक गोपनीय माहिती कोणालाही न देणे, असे आवाहन पोलिसांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना MPSC व UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि प्रभावी तयारी कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमाला महाविद्यालयातील ७० ते ८० विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
Previous Post Next Post