तलाठी कार्यालये बंद; ग्रामस्थांची कामे खोळंबली..चिरादेवी सजा क्र.३० तील गवराळा येथे नियमित तलाठ्याची नियुक्ती करण्याची मागणी; कार्यालय परिसरात झुडपांचा विळखा..

तलाठी कार्यालये बंद; ग्रामस्थांची कामे खोळंबली..

चिरादेवी सांजा क्र.३० तील गवराळा येथे नियमित तलाठ्याची नियुक्ती करण्याची मागणी; कार्यालय परिसरात झुडपांचा विळखा..

महेश निमसटकर
 जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 




भद्रावती दि. 1:-तलाठ्यांच्या बदल्यांनंतर भद्रावती तालुक्यातील काही तलाठी कार्यालये बंद अवस्थेत पडली असून, त्याचा थेट फटका ग्रामस्थ, शेतकरी आणि शेतमजुरांना बसत आहे. चिरादेवी साजा चे तलाठी कार्यालयही सध्या नियमित तलाठी उपलब्ध नसल्याने अडचणीचे ठरत आहे. कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने परिसर अस्वच्छ झाला असून, सापांसह इतर उपद्रवी प्राण्यांचा वावर वाढला आहे.

तलाठी कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे शासकीय केंद्र आहे. सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, विविध दाखले, जमीनविषयक नोंदी आणि महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जावे लागते. मात्र संबंधित कार्यालयात नियमित तलाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

तालुक्यातील अनेक तलाठ्यांच्या बदल्या झाल्यानंतर काही ठिकाणी पदे रिक्त आहेत. त्यातच उपलब्ध तलाठ्यांवर दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी संबंधित गावांतील नागरिकांची महसूलविषयक कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

नियमित तलाठ्याची नियुक्ती कधी?

चिरादेवी सांजा गवराळा येथे नियमित तलाठ्याची नियुक्ती करून कार्यालय नियमितपणे सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच बंद कार्यालय परिसरातील वाढलेली झुडपे तातडीने हटवून स्वच्छता करण्यात यावी, अशीही मागणी आहे. महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गवराळा येथे 
 कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या क्षेत्रातील नागरिकांची महसूलविषयक कामे खोळंबणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post