साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला वाली कोण?डॉक्टरांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; रिक्त पदांमुळे ग्रामीण रुग्णसेवेचा बोजवारा.

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला वाली कोण?
डॉक्टरांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; रिक्त पदांमुळे ग्रामीण रुग्णसेवेचा बोजवारा.

यावल दि.१५ (सुरेश पाटील) : यावल तालुक्यातील १२ गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत आणि आरोग्य सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

डॉक्टरांच्या उपलब्धतेपासून ते उपकेंद्रांतील रिक्त पदांपर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या कारभारावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

डॉक्टरांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही डॉक्टरांनी आठवड्यातील दिवस आपापसांत वाटून घेतल्याची चर्चा असून,मुख्यालयी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे अपेक्षित असताना डॉक्टरांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनत आहे.उपकेंद्रांतील रिक्त पदांचा प्रश्न कायम साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांची पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरली जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे. मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून, नागरिकांना अपेक्षित आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत.
२४×७ सेवेचा लाभ रुग्णांना मिळतो का?
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला २४ तास सेवा देणारे केंद्र म्हणून ओळखले जात असले, तरी प्रत्यक्षात सायंकाळनंतर वैद्यकीय सेवा कितपत उपलब्ध असते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत थांबून निघून जातात. त्यानंतर ग्रामीण भागात एखादी आपत्कालीन घटना घडल्यास रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवावे लागत असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे २४×७ आरोग्यसेवेचा प्रत्यक्ष लाभ रुग्णांना मिळतो की नाही, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी डॉक्टरांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे, रिक्त पदे भरणे आणि २४×७ सेवेचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी या परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकीकडे ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असताना दुसरीकडे डॉक्टरांची उपलब्धता, रिक्त पदे आणि रात्रीच्या सेवांबाबत प्रश्न निर्माण होत असतील, तर या समस्यांकडे लक्ष देणार कोण? साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराला वाली कोण, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Previous Post Next Post