केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत जळगावात जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मान्यवरांकडून विनम्र अभिवादन.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत जळगावात जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा. 
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना मान्यवरांकडून विनम्र अभिवादन.

यावल दि.१५(सुरेश पाटील)
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि ‘जनजातीय गौरव दिना’चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

या कार्यक्रमास केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच भाजपा जिल्हा संघटनेकडून दि. ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा केला जात असून त्याअंतर्गत हा शासकीय कार्यक्रम घेण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास खासदार श्रीमती स्मिताताई वाघ,अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार जळगावच्या तहसीलदार श्रीमती शीतल राजपूत यांच्यासह आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
आदिवासी महिला बचत गटांचा गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदिवासी महिला बचत गटांचा सत्कार.आपल्या उल्लेखनीय कार्य,उद्योगशीलता आणि स्वावलंबनातून आदर्श निर्माण करणाऱ्या महिला बचत गटांना यावेळी प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रे व धनादेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला निश्चितच बळ मिळणार आहे,अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

भगवान बिरसा मुंडा प्रेरणेचा अखंड स्रोत ----
आपल्या भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला.

बिरसा मुंडा हे झारखंडचे आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते जे १९ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध मुंडा बंड - उलगुलानचे नेतृत्व करण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला आणि त्यांची जयंती २०२१ पासून ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरी केली जाते,जेणेकरून स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांच्या योगदानाचा सन्मान व्हावा.  

"भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या शौर्य, संघर्ष आणि अदम्य राष्ट्रप्रेमातून जनजातीय समाजाच्या स्वाभिमानासाठी व हक्कांसाठी दिलेला लढा संपूर्ण देशासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतील," असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकार आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून,यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
Previous Post Next Post