*बाजारात रबरी चपलांचा आलाय ऊत; दुकानदारांच्या मनात बक्कळ कमाईचे भूत!**शासन-प्रशासन देईल का लक्ष्य, की ग्राहक राजा असाच होत राहील भक्ष्य?*

*बाजारात रबरी चपलांचा आलाय ऊत; दुकानदारांच्या मनात बक्कळ कमाईचे भूत!*

*शासन-प्रशासन देईल का लक्ष्य, की ग्राहक राजा असाच होत राहील भक्ष्य?*

प्रशांत बाफना / अहिल्यानगर 

उद्योग-व्यवसाय कोणतेही असो ते कुणीही समाजसेवा करायची म्हणून सुरू करत नाही तर त्यातून अर्थार्जण करता यावे हाच हेतू असतो मात्र हा हेतू जोपासताना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचेही हित पाहिले जावे, एवढी माफक अपेक्षा पदरमोड करून ग्राहक होणाऱ्याने करू नये का? असा प्रश्न दिवाळी निमित्ताने बाजारात खरेदी करण्यासाठी फेरफटका मारताना निर्माण झाला आहे. 
                 याविषयी सविस्तर वृत्त असे की, सध्या दुष्काळ असूनही दिवाळीची खरेदी जोरात सुरू आहे. यामुळे सगळीकडे बाजारपेठा ग्राहकांनी भरगच्च फुललेल्या आहेत. अशाच प्रकारे चपलांची दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहत आहे. चपलांच्या दुकानात जेव्हा ग्राहक चपला घेण्यासाठी जातो, तेव्हा खालून जाड वजनदार रबरी सोल आणि वर त्या वजनाला न झेपणारे पट्टे लावलेल्या चपलांचा ढिगार ग्राहकांसमोर दुकान मालक किंवा त्याने दुकानात ठेवलेले नोकर टाकतात. ज्यांची किंमत ४०० ते ६०० एवढी लावली जाते. एवढी मोठी रक्कम देऊनही धड सहा महिने ही न चालणाऱ्या चपला समोर पाहिल्यावर ग्राहक विचारतो, बाबा या अशा कशा चपला आहेत तर चपला दाखविणाऱ्यांचे उत्तर ठरलेले येते. ते म्हणतात सध्या याची फॅशन आहे. सर्व कंपन्यांवाले अशाच चपला बनवू लागले आहेत. यावर ग्राहक मनाशीच म्हणतो कशाची डोंबल्याची तकलादू फॅशन आहे ही.

चौकट - १

*पावसाळा वगळता रबरी चपला आरोग्यास हानिकारक*

चपला घेताना पावसाळा वगळता रबरी चपला घेतल्या तर त्या माणसाच्या आरोग्यासाठी सुद्धा नुकसानकारकच आहेत. रबरी सोल माणसाच्या तळपायातून निघणारे घाम शोषूण घेत नाही. पावसाळा वगळता इतर ऋतूत रबरी सोलांच्या चपला जास्त तापतात. ही उष्णता तंतू पेक्षा बारीक असलेल्या तळ पायातील धमन्या मस्तकापर्यंत पोहोचवितात. हे पाहता रबरी सोल असलेल्या चपला पावसाळा वगळता इतर ऋतूत वापरणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे सहज लक्षात येते.

चौकट - २

*चप्पल विक्रेत्यांची अशी ही गोम*

पावसाळ्यात आवश्यक असलेल्या रबरी चपला दुकानदार पावसाळ्यात मात्र विक्रीस ठेवत नाहीत. कारण त्या १०० ते १५० रुपयाला मिळतात. त्याचे सोल आणि पट्टे सर्वकाही रबरी असतात आणि त्या चक्क दोन-तीन पावसाळे चालतात. मात्र तेव्हा दुकानदार त्या विक्रीसाठी आणत नाहीत. असे का? तर त्यांची किंमत कमी असल्याने त्यात त्यांना हवा त्या प्रमाणात नफा मिळत नाही आणि त्या लवकर खराब होत नाही म्हणून दुकानदार ते ठेवण्याचे टाळतात.

चौकट - ३

*लेदर चे सांगून रेगझिनच्या चपलांचा भडीमार*

पावसाळ्यात सोल आणि पट्ट्यांच्या रबरी चपला ग्राहकांना पाहिजे असतानाही त्यावेळी दुकानदार त्या चपला दुकानात ठेवत नाहीत मात्र पावसाळा संपून गेल्यानंतर तेच दुकानदार तकलादु पट्टे लावलेले आणि खालून वजनदार रबरी सोल असलेल्या चपलांचा भडीमार ग्राहकांसमोर करत आहेत. ग्राहक त्या पाहून जेव्हा वैतागतो, आणि त्यांच्यापेक्षा दुसरे चांगले असतील तर दाखवा म्हणतो तेव्हा चपला दाखविणारे म्हणतात लेदरचे आहेत, थोडे महाग असतील असे सांगून लेदर चे म्हणून समोर आणतात त्या रेगझिनच्या चपला. 

चौकट - ४

*ग्राहकांच्या कानात बिडी आणि गळ्यात रेडू समजतात?*


बहुतेक चपलांचे व्यापारी आजही ग्राहकांच्या कानात बिडी आणि गळ्यात रेडू समजतात की काय? असा प्रश्न ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बरं लेदरचे सांगून दाखवीत असलेल्या रेगझिनच्या चपलांची किंमत किती? तर ११०० रुपयांपासून पुढे अमर्याद. काय चाललंय हे? काय नाही? काही कळायला मार्ग नाही. मान्य आहे की, कुणीही व्यवसाय हा लाभ मिळावा म्हणूनच करतो परंतु अशा प्रकारे व्यवसाय करणे म्हणजे ग्राहकांची लूटच नव्हे का? कंपन्यांकडून दुकानदारांना अशा फालतू व टाकावू चपला किती रुपयांना मिळतात? त्यांनी ते कितीला विकायला हवेत? याचे काहीतरी तारतम्य हवे की नको? याकडे कुणी लक्ष देणार की नाही? या व्यवसायावर देखरेख करण्यासाठी एखादे सरकारी प्रशासनिक कार्यालय किंवा अधिकारी आहे की नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न चपलांच्या बाजारपेठेत सुरू असलेली लूट पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत.

चौकट - ५

*येथेही तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असायला हवेत*

चपलांच्या बाजारपेठेवर अन्नपुरवठा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हायला हवी. शासन याकडे कधी लक्ष देईल? असा प्रश्नही चपलांच्या बाजारपेठेत सुरू असलेली लूट पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे.
लेखन - *एस.एम.युसूफ़* संकलन प्रशांत बाफना
Previous Post Next Post