दोन वर्षांपासून वनविभागाची गस्तीची गाडी बंद अवस्थेत!वनपाल डाकोरे यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय वाहन धूळखात? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी

दोन वर्षांपासून वनविभागाची गस्तीची गाडी बंद अवस्थेत!

वनपाल डाकोरे यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय वाहन धूळखात? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी

 मारोती एडकेवार 
नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड : बिलोली तालुका वनविभागाच्या जंगल संरक्षणासाठी आणि अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार तसेच वनक्षेत्रातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून गस्तीची वाहने उपलब्ध करून दिली जातात. मात्र, वनविभागाची गस्तीची गाडी मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत उभी असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

शासकीय निधीतून उपलब्ध करून दिलेले वाहन दोन वर्षांपासून वापराविना उभे असल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहन बंद असताना जंगलातील गस्त कशी केली जाते? वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार आणि इतर गैरप्रकारांवर नियंत्रण कसे ठेवले जाते? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

संबंधित वनपालांनी वाहन सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले? वाहन दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती का? तसेच दोन वर्षांपासून वाहन बंद ठेवण्यास जबाबदार कोण, याची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय वाहन हे जनतेच्या पैशातून चालवले जाते. त्यामुळे त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वाहन तातडीने सुरू करावे आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
Previous Post Next Post