बोगस बियाणे विक्रेत्याला पकडले, ब्लॅकने विकणाऱ्यांवरही कारवाई कराचवाहनासह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त. (शहादा, तालुका प्रतिनीधी) 30: तालुका कृषी विभागाने मिळालेल्या गोपनीय माहितीचा आधारे शहादा शहरासह तालुक्यातील अनरद अश्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कार्यवाही केली. प्रतिबंधीत संशयित एचटीबीटी कापसाचे बोगस बियाण्यांचा सुमारे तीन लाख रकमेचा मुद्देमाल वाहनासह जप्त केला. याबाबत शहादा व सारंगखेडा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अधिकृत बियाणे जादा दराने विकणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांबाबत फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हाभरात कृषी विभागाने सात पथके स्थापन केली आहेत. या पथकाला मिळालेल्या गुप्त महितीच्या आधारे नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुक्यातील अनरद येथे व शहादा शहरात प्रतिबंधित संशयित एचटीबीटी कापसाच्या बोगस बियाण्यांची पाकीटे जप्त करण्यात आली आहेत. सदर कारवाईसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, नाशिक विभागाचे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी नीतेंद्र पानपाटील (नाशिक) यांनी मार्गदर्शन केले. त्यांचाच मार्गदर्शनाने सोमवारी (ता.२७) दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबारचे कृषि विकास अधिकारी किशोर हडपे, शहाद्याचे उपविभागीय कृषि अधिकारी तानाजी खर्डे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, मोहीम अधिकारी सचिन देवरे, शहादा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश साठे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, श्री पेंढारकर, महेश विसपुते यांच्या पथकाने दुपारी चार वाजेपासून पाळत ठेवून अनरद येथील खाजगी इसम हिरालाल महाजन यांच्या राहत्या घरी व रात्री नऊ वाजता खासगी इसम रमाकांत वंजारे व त्याचा साथीदार याला शहादा येथे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले. पकडलेले बियाणे हे शहादा व सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सापडल्याने दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शहादा पोलीस ठाण्यात स्वप्निल शेळके यांनी रमाकांत वंजारे व त्याचा साथीदार, उत्पादक कंपनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर सुरेश साठे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात हिरालाल महाजन व उत्पादक कंपनी यांचा विरोधात बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलीस तपासामधून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे मधील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असे नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यात बोगस बियाण्यांसोबत अधिकृत बियाण्याची किरकोळ विक्री दरापेक्षा जास्त भावाने विक्री होत आहे. या दोन नंबरच्या व्यवहारात कोणताही पुरावा (लेखी विक्री पावती) दुकानदार शेतकऱ्यांना देत नाही. गरजे पोटी शेतकरी लुबाडला जात आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग पुराव्याशिवाय कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येत. बोगस बियाण्याचा पुरावा नसताना कारवाई केली आहे तर या प्रकरणी किमान कृषी सहाय्यकांच्या उपस्थितीत बियाण्याची विक्री केली तरी दुकानदारांना योग्य दराने बियाणे विक्री करतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Previous Post Next Post