*देवळीचे समाजसेवक नारायण सुरकार यांची वर्धा जिल्हा समीक्षकपदी नियुक्ती.....*. (वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी:-विपुल पाटील. ) देवळी शहरातील समाजकार्यात अग्रेसर आणि तत्पर नेतृत्व करणारे समाजसेवक नारायण सुरकार यांची श्री संताजी अखिल तेली समाज संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने वर्धा जिल्हा समीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बेनजोई, उपाध्यक्ष प्रीती चौधरी, चेतन वरटकर, गजू देशमुख, अविनाश डाफे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल देवळी तसेच संपूर्ण जिल्ह्यातील समाजबांधवांनी उत्स्फूर्त स्वागत करून हार्दिक अभिनंदन केले. नारायण सुरकार यांनी आजवर सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त त्यांनी दरवर्षी शंभर लिटर दुधाचे वाटप करून सामाजिक बंधुता जपली आहे. सामान्य गोर-गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, तर गरीब महिलांना उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. याशिवाय गरजू बालकांचे पालन-पोषण, पत्रकार, कष्टकरी व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा, तसेच दरवर्षी डोळ्यांचे तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप अशा सामाजिक कार्यात त्यांचे योगदान विशेष ठरले आहे. गावातील सार्वजनिक चौकात विद्युत दिवे बसविणे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून १०वी व १२वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करणे या कार्यामुळे त्यांची ओळख समाजहितैषी नेत्याच्या रूपात झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या कार्याचा गौरव करून त्यांच्यावर जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. येत्या काळात संघटनेच्या वाढीसाठी ते अधिकाधिक योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नारायण सुरकार यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देवळीचे समाजसेवक नारायण सुरकार यांची वर्धा जिल्हा समीक्षकपदी नियुक्ती.....*.                                          
Previous Post Next Post