जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट, राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला सखोल आढावा. (यावल प्रतिनिधी रविंद्र आढाळे)आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आश्रमशाळांमधील सुविधा व प्रशासकीय कामकाजाचा थेट आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी आश्रमशाळांचे व्यवस्थापन, विविध शासन योजनांची स्थिती, आर्थिक प्रगती, प्रलंबित नोंदी व प्रशासकीय बाबींची सविस्तर पाहणी करत अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, बांधकामांची सद्यस्थिती, निधीचा योग्य वापर तसेच कर्मचारी व्यवस्थापन याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच योजनांचा थेट लाभआदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल येथील प्रकल्प कार्यालयातून सहभाग नोंदविला. बैठकीत आश्रमशाळांच्या सुविधा, नवीन व प्रगतिपथावरील बांधकामे, निधी खर्चाची स्थिती, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच ‘धरती आबा जनजातीय गौरव वर्ष’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सखोल समीक्षा करण्यात आली.ग्राम व तालुका स्तरावर विकास आराखडे तातडीने पूर्ण करून त्यावर आधारित जिल्हास्तरीय आदिवासी विकास आराखड्याची अंमलबजावणी गतीमान करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. आराखड्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा व उपजीविकेच्या संधी यांचा समावेश करून समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला.दरम्यान, संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) अनावरण करून उपस्थित अधिकाऱ्यांनी संविधान मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.या प्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे आदिवासी विकास योजनांच्या कामकाजाला नवी दिशा व गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0