आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा,भद्रावती येथे ‘खरी कमाई’ उपक्रमातून श्रमप्रतिष्ठेचा संदेश.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.23 :- विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि कष्टाच्या मोबदल्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालय चांदा, भद्रावती येथील कब्स - बुलबुल तसेच स्काऊट - गाईड विभागामार्फत ‘खरी कमाई’ हा अभिनव उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.मागील तीन दिवसांपासून विद्यालयात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन सुरू असताना, त्याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकवण देणारा ठरला. श्रमाला प्रतिष्ठा आहे आणि केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा, ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजावीत, यासाठी स्काऊट व गाईड विभागाने या उपक्रमाचे आयोजन केले.उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थ व लघुउद्योगाशी संबंधित वस्तू तयार केल्या. त्यानंतर शाळेच्या परिसरात स्टॉल लावून त्या वस्तूंची विक्री करण्यात आली. स्वतः मेहनत करून वस्तू तयार करणे, ग्राहकांशी संवाद साधणे, किंमत ठरवणे आणि मिळालेल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करणे, अशा अनेक बाबींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.हा उपक्रम विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय गणेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. स्काऊट प्रमुख श्री. आल्हाद चकोले तसेच कब्स - बुलबुल प्रमुख श्री. पवन येनुगवार यांनी उपक्रमाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.सदर ‘खरी कमाई’ उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0