अकोटमध्ये खुनाचा पर्दाफाश; पवन इंगळेला पोलिसांची बेडी.: आरोपीचा बनाव उघड; पोलिसांनी केला खुनाचा उलगडा.. अकोट – शहरातील महेश कॉलनी परिसरात घडलेल्या संशयित मृत्यू प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी चोख तपास करून केला आहे. आत्महत्येचा बनाव करून प्रत्यक्षात खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास पवन लक्ष्मण इंगळे (वय २७, रा. महेश कॉलनी, अकोट) हा पोलिस स्टेशनमध्ये आला आणि त्याने अनेक वर्षांपासून सोबत राहत असलेल्या महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार श्री. अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, एएसआय अनिल वक्टे व पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय अकोट येथे पाठवून मर्ग क्रमांक ३४/२५ नोंद करण्यात आली.त्यानंतर ८ डिसेंबर रोजी सुरू असलेल्या तपासादरम्यान पोलिसांना घटनेत संशय वाटल्याने आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात आली. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पीएम अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा निष्कर्ष नमूद आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.मृतक महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून अकोट पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४८४/२५, कलम १०३(१) भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलिस निरीक्षक अमोल माळवे, पीएसआय निलेश बारहाते, वैभव तायडे, एएसआय अनिल वक्टे, पोहेकाँ नंदकिशोर कुलट, नापोका विपुल सोळंके, पोकों विशाल दारोकर, चालक संदीप तायडे आणि सुरेश माकोडे यांचा समावेश होता.
byमीडीया पोलीस टाईम
-
0