> *लाडकी बहीण योजनेतील अडचणी दूर; आमदार रणधीर सावरकरांच्या पाठपुराव्याला यश*> *ई-केवायसीतील त्रुटींवर शासनाची दखल; अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश*. (अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री नामदार अतिदी ताई तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या भावना पोहोचवत, लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची ई-केवायसी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्याने अनेक लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर योजनेचा लाभ कोणत्याही पात्र महिलेला वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चुकीच्या नोंदी दुरुस्त होऊन लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार रणधीर सावरकर यांनी लाडक्या बहिणींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेत अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच नामदार अतिदी ताई तटकरे यांचे आभार मानले असून, त्यांची कार्यतत्परता, समाजाप्रती असलेली संवेदना आणि पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश मिळाले आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0