शहादा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा... (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक). ‌‌. शहादा (प्रतिनिधी) :येथील शासकीय विश्रामगृहात शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत शहादा तालुका पत्रकार संघाने शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार जगदीश जयस्वाल यांच्या मातोश्रींच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल उपस्थित पत्रकारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत चौधरी उपस्थित होते. यावेळी पत्रकार चंद्रकांत शिवदे यांनी कविता सादर करून उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नेत्रदीपक कुवर यांनी आपल्या मनोगतात पत्रकारिता ही निपक्ष असावी, असे सांगून पत्रकार संघटना अनेक असल्या तरी सर्व पत्रकारांनी एकत्र राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे यशवंत चौधरी यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डी. सी. पाटील यांनी पत्रकारांनी अन्यायाला वाचा फोडणारी, निर्भीड व निपक्ष पत्रकारिता अंगीकारावी, असे आवाहन केले.दरम्यान, शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नेत्रदीपक कुवर यांना ‘खानदेश भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल तसेच ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डी. सी. पाटील यांनी आयुर्वेदिक आहार व पोषण विषयातील पदविका संपादन केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्रा. अब्रार खान, बापू घोडराज, दीपक वाघ, ज्येष्ठ पत्रकार के. डी. गिरासे, सलाउद्दीन लोहार, विजय निकम, कृष्णा निकम, बिरारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव योगेश सावंत यांनी केले, तर उपाध्यक्ष हर्षल साळुंखे यांनी आभार मानले.

शहादा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा...                                                                       
Previous Post Next Post