जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गिरड (मुली) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.. (गिरड | प्रतिनिधी) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गिरड (मुली) येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर विराजमान होते. प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती विद्यालय, धोंडगाव येथील मुख्याध्यापक अतुल देवढे सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी प्रेरणादायी प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.अध्यक्षीय भाषणात महाजन सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणकार्याचा आढावा घेत, समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या संघर्ष व त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन घडू शकते, असे त्यांनी नमूद केले.प्रमुख अतिथी अतुल देवढे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित आचरण व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यार्थिनींनी भाषणे, कविता व विचारमंचाद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद कु भारती डकरे, संगीता खुडसंगे,कु सिमा शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन कु मंजुषा बचेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ पुष्पलता भास्करराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0