*अखेर गैरवर्तन करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित!पोलीस अधीक्षकांची गंभीर दखल; बडतर्फीची कारवाई प्रस्तावित*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला : महिला विनयभंग प्रकरणी अखेर संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस उपनिरीक्षक शंकर सुरेश बोंडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशीनंतर पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला बाळापूर नगर परिषदेतून अकोल्याकडे येत असताना, शळद फाटा परिसरात आरोपी पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे यांनी तिचा पाठलाग केला. पुढे व्याळा गावाजवळ त्यांनी गाडी आडवी लावत अश्लील व घाणेरडे इशारे केले. महिला पुढे निघून गेल्यानंतरही आरोपीने पुन्हा पाठलाग करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे फिर्यादीस लज्जा व मानसिक त्रास सहन करावा लागला.या घटनेनंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन बाळापूर येथे तक्रार दाखल केली असून, त्यावरून अपराध क्रमांक ०२/२६ अन्वये कलम ७८, ७९, १२६(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, आरोपी अधिकारी हा गुन्हा घडला त्यावेळी कर्तव्यावर गैरहजर होता.पोलीस उपनिरीक्षकासारख्या जबाबदार पदावर कार्यरत असताना कायद्याचे पूर्ण ज्ञान असूनही केलेले हे कृत्य अत्यंत अशोभनीय, अनुशासनभंग करणारे व नैतिक अधःपतन दर्शविणारे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गैरवर्तणुकीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असल्याचे उघड झाले असून, त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारतीय संविधान कलम ३११ (व) अन्वये विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.दरम्यान, महिलांविरोधातील कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, मग संबंधित व्यक्ती खाजगी असो वा शासकीय अधिकारी—अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून पोलीस अधीक्षक, अकोला यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0