माझं गांव आरोग्य संपन्न गांव अभियानास वेग*

*
माझं गांव आरोग्य संपन्न गांव अभियानास वेग*

*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण 
———————————

पाथरीत ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला वेग
तालुकास्तरीय कार्यशाळेत प्रभावी अंमलबजावणीचा निर्धार; ग्रामपातळीवर आरोग्य क्रांतीची मुहूर्तमेढ
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या *‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’*  या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाथरी येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. सभापती श्रीमती सुनिता गजेंद्र डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेस पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), आरोग्य सहाय्यक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांचा समन्वय साधत या अभियानाला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न यावेळी दिसून आला.
या कार्यशाळेत अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची रूपरेषा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या निर्णयानुसार हे अभियान राज्यभर 1 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात आले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि समग्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अभियानांतर्गत संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता व बाल आरोग्य सुधारणा, स्वच्छता व पोषण यावर भर देणे तसेच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. “प्रजा निरोगी तर राज्य सशक्त” या संकल्पनेवर आधारित हे अभियान ग्रामपातळीवर लोकसहभागातून राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायत हा त्याचा केंद्रबिंदू असेल.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, पोषण, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि डिजिटल आरोग्य नोंदी यांचा समावेश असलेला सर्वसमावेशक उपक्रम आहे. यामधून ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या अभियानात लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले असून ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून गावागावात सकारात्मक आरोग्य बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. गाव पातळीवर आरोग्य ग्रामसभा, जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समित्यांची स्थापना करण्यात आली असून तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय साधला जाणार आहे. नियमित आढावा बैठकीद्वारे प्रगतीचे मूल्यांकन करून आवश्यक ती सुधारणा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून घोषित करून पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये आरोग्यविषयक स्पर्धात्मकता वाढून अधिक चांगले परिणाम साध्य होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आरोग्य हा केंद्रबिंदू असला पाहिजे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव निरोगी व सशक्त बनविणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला. एकूणच, पाथरी येथे पार पडलेली ही कार्यशाळा ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वी अंमल बजावणीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
Previous Post Next Post