नांदेड - बिदर रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारचा नकार खा. अशोकराव चव्हाणांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर:महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नांदेड बिद रेल्वे प्रकल्पाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी आपल्या वाट्याचा ५० टक्के खर्च उचलण्यास कर्नाटकमधील काँग्रेसच्या राज्य सरकारने नकार दिला आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी कर्नाटक राज्य सरकारची ही भूमिका निराशाजनक व दोन्ही राज्यातील
जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासणारी असल्याची टीका केली आहे. नांदेड येथे गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती' दिशा'च्या बैठकीत रेल्वे विभागाच्या पायाभूत
सुविधांच्या प्रगतीबाबतच्या अहवालातून ही गंभीर बाब उघडकीस आली. नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्राच्या भाजप महायुती सरकारने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या वाट्याचा ५० टक्के खर्च उचलण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारने २४ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकल्पासाठी आपल्या वाट्याचा ५० टक्के खर्च उचलण्याबाबत नकार अनिच्छा व्यक्त केली आहे. केंद्र तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या ५०:५० टक्के खर्च भागीदारीतून सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे प्रकल्प राबविण्यास केंद्र सरकाने संमती दिली होती. या प्रकल्पातील सुमारे १०१ किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात तर ५६ किलोमीटर कर्नाटक राज्यात उभारला जाणार होता. या रेल्वे मार्गामुळे नांदेड येथील श्री हजूर साहिब आणि बिदर येथील श्री नानक झिरा साहिब ही दोन अत्यंत महत्त्वाची शीख तीर्थक्षेत्रे थेट रेल्वे मार्गाने जोडणे शक्य होणार आहे. त्यातून भाविकांना सुविधा तसेच पर्यटन, व्यापार वरोजगार निर्मितीला चालनामिळणार होती. शिवाय नांदेड ते बंगळुरू दरम्यानचे रेल्वे अंतरही लक्षणीयरीत्या कमी झाले असते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा सुरु आहे. माजी मुख्यमंत्रीखा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-बिदर रेल्वे मार्गासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून, कर्नाटक सरकारच्या प्रतिकूल भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

