*महावितरणला दणका: ,🖕🖕विनासूचना वीज मीटर बदलणे*
*पडले महागात; जिल्हा ग्राहक आयोगाचा दिलासा*
धूळे जिल्हा प्रतिनिधी
*धुळे :* जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ग्राहकाचे मीटर बदलल्याप्रकरणी कंपनीला 'सेवेतील त्रुटी' (Deficiency in Service) धरत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार रुपेश मराठे यांनी ॲड.महेश मराठे यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दि.२५ मे २०२५ रोजी ग्राहकाच्या अनुपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग न घेता आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमावलीचे पालन न करता त्यांचे वापरात असलेले वीज मीटर बदलले होते. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगाचे दार ठोठावले होते. आयोगाने याप्रकरणी महावितरणला नोटीस बजावली होती, मात्र कंपनीतर्फे कोणीही हजर न राहिल्याने हे प्रकरण एकतर्फा चालवून निकाली काढण्यात आले.
आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, मीटर बदलताना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे आणि महावितरणने कोणतीही स्पष्टीकरण न देता किंवा कायदेशीर तरतुदी पाळल्याशिवाय केलेली ही कृती सेवा त्रुटी दर्शवते. या प्रकरणी आयोगाने तक्रारदार यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी एकूण आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश महावितरणला दिला आहे, ज्यामध्ये तीन हजार रुपये आर्थिक त्रासापोटी, तीन हजार रुपये शारीरिक व मानसिक त्रासापोटी आणि दोन हजार रुपये तक्रार अर्जाच्या खर्चापोटी आहेत. ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास, त्यावर सहा टक्के वार्षिक व्याजासह रक्कम देण्याची जबाबदारी महावितरणवर सोपवण्यात आली आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना तक्रारदार यांचे वकील ॲड. महेश मराठे म्हणाले की, हा निकाल सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठा विजय आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार करणे चुकीचे आहे.

