मंदिर चोरीचा पर्दाफाश : तीन आरोपी अटकेत; ४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त
...................................... मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
.......................................
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच सेलू पोलीस स्टेशन आणि रामनगर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत मंदिरातील चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व दोन दुचाकींसह एकूण ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रारदार आकाश रविंद्रजी म्हैस्कर (वय ३२, रा. तकली जादशी, ता. सेलू) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार ७ एप्रिल रोजी दुपारी ३.४६ ते ३.४९ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी केळझर येथील बौद्ध मठात प्रवेश करून दानपेटीतून सुमारे २० हजार रुपये चोरी केल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी नागपूर येथे सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिकेत समीर जुगनाके उर्फ वाटकर (२१), अमित छन्नूलाल सहरिया (२२) आणि पृथ्वी उर्फ विजय कुशिंद्र हट्टीमारे (२०) यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी केळझर येथील बौद्ध मठातील चोरीसह रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील नागठाणा रोडवरील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून ११,५०० रुपये रोख, चार अँड्रॉइड मोबाईल फोन (४५,००० रुपये), एक केटीएम ड्यूक दुचाकी (२,५०,००० रुपये) व एक पल्सर एनएस १६० दुचाकी (१,७५,००० रुपये) असा एकूण ४,८१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात सचिन इंगोले, भूषण निगोट, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, अमोल नागराले, मंगेश चवारे, अरविंद इंगोले आदी पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

