अवैध धंदे ८ दिवसांत बंद करा, अन्यथा जनआंदोलन छेडणार; राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाचे निवेदन)
फैजपूर येथून जवळ असलेल्या निंभोरा तालुका रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या सट्टा, पत्ता, मटका आणि हातभट्टी दारू यांसारख्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. हे अवैध धंदे येत्या ८ दिवसांत पूर्णपणे बंद न झाल्यास तीव्र जनआंदोलन आणि मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान हाजी अ. करीम यांनी दिला आहे.
या संदर्भात शेख कुर्बान यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांना लेखी निवेदन दिले असून, त्याच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
काय आहे निवेदनातील मुख्य तक्रार?
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, निंभोरा आणि रावेर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. विशेषतः मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांतील पुरुष या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. कष्ट करून कमावलेला पैसा हे लोक जुगार आणि दारूवर उडवत असल्याने घरात उपासमारीची वेळ आली आहे. महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेक संसार उघड्यावर आले आहेत.
पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
या निवेदनात धक्कादायक आरोप करण्यात आला आहे की, "अवैध धंदेवाईक पोलीस प्रशासनाला हप्ते देऊन आपले धंदे बिनदिक्कतपणे चालवत आहेत." गरिबांची लूट करून स्वतःचे खिसे भरणारे हे धंदे तातडीने थांबवणे गरजेचे असल्याचे शेख कुर्बान यांनी म्हटले आहे.
८ दिवसांचा 'अल्टिमेटम'
पोलीस प्रशासनाने पुढील ८ दिवसांच्या आत या सर्व अवैध हालचालींवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर मुदतीत कारवाई झाली नाही, तर होणाऱ्या आंदोलनाला आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या मागणीमुळे आता पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

