ग्राहक पंचायत महाराष्ट्र करणार रुग्ण हक्क सेवा जागृती

ग्राहक पंचायत महाराष्ट्र करणार रुग्ण हक्क सेवा जागृती 


महेश निमसटकर (विशेष कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्य) भद्रावती चंद्रपूर 

भद्रावती, दि.०९ : रुग्णालयांची मनमानी खपवून न घेता रुग्णांनी आपल्या हक्क सेवांबाबत जागृत रहावे, यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रांत संघटक डॉ. उपाध्याय, प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांच्या मार्गदर्शनात करणार असल्याचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष, प्रविण चिमुरकर यांनी केले आहे.
     वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण हा केवळ एक रुग्ण नसून तो सेवा घेणारा ग्राहक देखील आहे. आरोग्य मंत्रालयाची 'रुग्ण हक्क सनद' (Charter of Patient Rights) आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत रुग्णांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तरीही अनेक रुग्णालयांकडून सामान्य जनतेची लूट होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती तर्फे रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जनजागृती करण्यात येत आहे.
=======================
​ *काय आहे रुग्णांचे कायदेशीर हक्क*
• *बिलाचा सविस्तर तपशील मिळवणे (Itemized Bill) :*
प्रत्येक रुग्णाला डिस्चार्जच्या वेळी केवळ एकूण रकमेचे बिल न घेता, प्रत्येक औषध, साहित्य आणि डॉक्टरांची फी यांचा स्वतंत्र तपशील (Itemized Bill) मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे. रुग्णालयाने असा तपशील नाकारणे ही 'सेवेतील त्रुटी' मानली जाते.
• *उपचारापूर्वी खर्चाचा अंदाज (Estimated Cost) :*
'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट'नुसार, आपत्कालीन स्थिती वगळता, कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा उपचारापूर्वी त्याचा संभाव्य खर्च लेखी स्वरूपात रुग्णाला देणे बंधनकारक आहे. ऐनवेळी बिलात मोठी वाढ करणे हा कायद्याचा भंग आहे.
• *बिलासाठी रुग्णाला डांबून ठेवणे बेकायदेशीर :*
बिलाच्या थकबाकीसाठी किंवा वादासाठी कोणत्याही रुग्णाला किंवा मृताला रुग्णालयात ओलीस (Detain) ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की बिल वसुलीसाठी रुग्णालय दिवाणी न्यायालयाचा मार्ग अवलंबू शकते, पण रुग्णाला डांबून ठेवू शकत नाही.
• *औषधांच्या किमतीवर नियंत्रण (MRP Compliance) :*
रुग्णालयातील फार्मसी औषधे किंवा सर्जिकल साहित्यावर छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त दर आकारू शकत नाही. लीगल मेट्रोलॉजी ॲक्टनुसार हे दंडनीय आहे. तसेच औषधे बाहेरून विकत घेण्याचे स्वातंत्र्य देखील रुग्णाला असते.
• *७२ तासांत वैद्यकीय कागदपत्रे मिळवणे :*
रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी मागणी केल्यास रुग्णालयाने सर्व वैद्यकीय रेकॉर्ड्स (Reports/Case Papers) ७२ तासांच्या आत देणे अनिवार्य आहे. हे रेकॉर्ड्स रुग्णाची खासगी मालमत्ता आहे.

​ *कॅशलेस विमा धारकांसाठी नियम*
• IRDAI च्या नवीन नियमांनुसार, रुग्णालयाने डिस्चार्जची कागदपत्रे पाठवल्यानंतर ३ तासांच्या आत विमा कंपनीने निर्णय देणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त विलंब झाल्यास होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी विमा कंपनीची राहील.
=======================
     ​ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती ने रुग्णांना आवाहन केले आहे की, रुग्णांनी उपचारादरम्यान सजग राहणे गरजेचे आहे. जर कोणत्याही रुग्णालयाकडून आपल्या हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर घाबरून न जाता लेखी तक्रार नोंदवावी. ग्राहक पंचायत महाराष्ट्र अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सदैव तत्पर आहे. 
-प्रवीण चिमुरकर, अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती
Previous Post Next Post