संघर्षाला यशाची सोन्याची किनार ; साहिल दावलेकरने दहावीत मिळवले ९०. ४० टक्के गुण
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील बडूर येथील गरीब परिस्थिती, हालअपेष्टा आणि संघर्षमय जीवन यांवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बडूर येथील विद्यार्थी साहिल साहेबराव दावलेकर याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९०.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. साहिलच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
साहिलचे वडील साहेबराव दावलेकर आणि आई रेखाताई दावलेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवत आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी मोठा संघर्ष केला. आर्थिक अडचणी, कष्टमय जीवन आणि अनेक संकटांना सामोरे जात असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. आई-वडिलांच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव ठेवत साहिलनेही अभ्यासात सातत्य ठेवून मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले.
दिवसरात्र अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे साहिलने हे यश संपादन केल्याची भावना व्यक्त केली. “आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करण्यासाठीच मी अभ्यास केला,” असे साहिलने सांगितले.
साहिलच्या यशामुळे दावलेकर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असून आजोबा, आजी, काका, काकू, आत्या, मामा तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. गावातील नागरिकांनीही साहिलच्या जिद्दीचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
साहिलच्या यशामुळे बडूर गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, संघर्षातूनही मोठे यश मिळवता येते हे साहिलने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

