शहाद्यात बॉम्ब फुटला! सरकारी साहेबाने प्रतिष्ठितांनाच गंडवले, कोट्यवधी घेऊन कुटुंबासह पळाला..
(प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक )
शहादा : शहादा तालुका हादरला आहे. तालुक्यातीलच एका सरकारी साहेबाने मोठमोठ्या प्रतिष्ठितांना कामाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना चुना लावल्याचा सनसनाटी आरोप आहे. आणि आरोपी कुटुंबासह रातोरात गायब!
गत काही वर्षांपासून मंत्रालयात काही टक्के दिली की कामाचा ठेका मिळतो अशी चर्चा शहादा तालुक्यात कामे करणाऱ्या ठेकेदारांमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही विभागाच्या योजनेतील जास्तीजास्त रकमेचा शासकीय ठेका कसा मिळेल यासाठी स्पर्धाही सुरू असते. ठेकेदारांची ही मानसिकता लक्षात घेऊन परजिल्ह्यात मोठ्या खुर्चीवर बसलेल्या शहाद्यातील एका अधिकाऱ्याने 'कामे काढून देतो' म्हणत जाळे टाकले. सुरुवातीला काही जणांना खरोखरच कामे मिळवून देऊन त्याने लोकांचा आंधळा विश्वास कमावला. याच विश्वासाच्या जीवावर त्याने मोठ्या लोकांकडून लाखो रुपयांच्या रकमा आपल्या खात्यात वळत्या करून घेतल्या, अशी जोरदार चर्चा आहे.
मग एका रात्रीत खेळ संपला. साहेब कुटुंबासह फरार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पैसे गुंतवणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अश्या प्रकरातील व्यवहार असल्याने अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
धक्कादायक म्हणजे, फसवणूक करोडोंची असूनही, अब्रू जाईल या भीतीने एकही बडा माणूस अजून शहादा पोलिस ठाण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवायला तयार नाही. तक्रारच नसल्याने पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहादा तालुक्यात फक्त याच एका गंड्याची चर्चा रंगली असून, फसलेले लोक आता एकमेकांना 'तुझे किती गेले?' असे विचारत फिरत आहेत. फसवणूकग्रस्त लवकरच एकत्र येऊन सामूहिक तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

