शेळगाव मध्ये भक्तीचा महापूर आशिषानंद भारती महाराजांच्या उपस्थितीत नृसिंह स्वामींचा भव्य विशेष महापूजा सोहळा.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर:भक्ती, शक्ती आणि अखंड लोकसेवेचा त्रिवेणी संगम आज मौजे शेळगाव येथे पाहायला मिळाला आहे. बाग गंगा मठाचे परमपूज्य मठाधिपती श्रद्धेय ष.ब्र.श्री आशिषानंद भारती महाराज (धारूर) यांचे आज शेळगावात शुभआगमन झाले. महाराजांनी श्री स्वयंभू नृसिंह स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे महापूजा केली. यावेळी अखंड शेळगाव नगरी नृसिंह स्वामींच्या जयघोषाने आणि महाराजांच्या दर्शनाने भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. दोन वर्षापूर्वी श्रद्धेय आशिषानंद भारती महाराजांच्या दिव्य प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून शेळगावच्या भूमीत 'दर पौर्णिमेला महाप्रसाद' या पवित्र उपक्रमाची सुरुवात झाली होती. पाहता पाहता या सेवेला तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली असून, एकही पौर्णिमा न चुकता हा अन्नदानाचा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. गावकऱ्यांची ही अथांग भक्ती पाहून आज महाराजांनीही शेळगावकरांचे विशेष कौतुक केले. या महाप्रसाद उपक्रमाची ख्याती आता पंचक्रोशीत पसरली आहे. नृसिंह स्वामींच्या चरणी अन्नदानाची सेवा अर्पण करण्यासाठी भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, आगामी पौर्णिमांच्या महाप्रसादाचे बजमानपद (कार्वे) मिळवण्यासाठी अनेक दानशूर भाविक सध्या 'वेटिंग 'वर आहेत. ही 'वेटिंग लिस्ट'च शेळगावकरांच्या श्रद्धेची खरी पावती आहे. आज मठाधिपती आशिषानंद महाराजांच्या दर्शनासाठी आणि महापूजेचा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण गावातील अबालवृद्ध, महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मंदिराच्या परिसरात झालेली गदीं आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या उपक्रमामुळे मौजे शेळगाव हे धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचे एक आदर्श केंद्र बनले आहे.

