शहाद्यात खळबळ! समाज कल्याण वस्तीगृहात अन्नातून विषबाधा; 50 विद्यार्थी बाधित, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

शहाद्यात खळबळ! समाज कल्याण वस्तीगृहात अन्नातून विषबाधा; 50 विद्यार्थी बाधित, 6 जणांची प्रकृती चिंताजनक

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

शहादा  : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी नवबौद्ध मुलांच्या वस्तीगृहात रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रात्रीचे जेवण केल्यानंतर 40 ते 50 विद्यार्थ्यांना एकाच वेळी विषबाधा झाली असून, यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

*नेमकं काय घडलं-
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री विद्यार्थ्यांना जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळी देण्यात आली होती. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, मळमळ, चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली. बघता-बघता बाधितांची संख्या 40 ते 50 वर पोहोचली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच वस्तीगृह प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले.

उपचारादरम्यान सहा विद्यार्थ्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

*पालकांचा संताप, रुग्णालयात तणाव-
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पालकांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी वस्तीगृह प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

*निकृष्ट जेवणाचा कळस!- 
विद्यार्थी आणि पालकांचा गंभीर आरोप आहे की, वस्तीगृहात सातत्याने निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. उलट तक्रार करणाऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे.

*प्रशासन अलर्ट मोडवर-
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मिताली सैठी, प्रांताधिकारी दीपक गिरासे, वैद्यकीय अधिकारी, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, आमदार यांचे स्वीय सहायक हेमराज पवार यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन बाधित विद्यार्थ्यांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून प्रकृतीचा आढावा घेतला. तर खाजगी रुग्णालयाची वैद्यकीय टीम डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली आणि विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.

प्रशासनाने वस्तीगृहातील उरलेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, विषबाधेचे नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.
खाजगी रुग्णालयाची वैद्यकीय टीम डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली आणि विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. रवी सुकलाल बैसाणे, कीर्ती राज सखाराम घोडेसर, मोहित महेंद्र बैसाणे, रोशन सुरेश शिंदे, आदित्य अंबालाल सूर्यवंशी, दिनेश योगेश मोहिते, पंकज सिताराम कुवर, प्रदीप सूर्यवंशी, शंकर सिताराम कुवर, चेतन महिरे, धनेश विनोद सोनवणे, चंद्रकांत रवींद्र सोनवणे, मयूर रणशिंगे, सागर रणशिंगे, धम्मवीर रतिलाल घोडास, रोशन शिंदे या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्‍यान, हे सर्व विद्यार्थी अनुसूचित जाती, नव बौद्ध मुलाची शासकीय निवासी शाळा येथे सहावी ते दहावीत शिक्षण घेत असून, ते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून मोहिदा शिवारातील शासकीय व वसतिगृहात वास्तव्यास आहेत.

*प्रश्न अनुत्तरितच-
या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई होणार का? भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना होणार का? याकडे आता संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post