शहाद्यात कृषी दिनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तंत्रज्ञान: के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचा 7 गावांत 'खेती बचाव अभियान'
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील
शहादा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात १ जुलै रोजी 'कृषी दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी दिनानिमित्त तालुक्यातील सात गावांमध्ये खेती बचाव अभियान राबविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे परिसरातील शेतकऱ्यांसाठी 'खेती बचाव अभियान' राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील तिखोरा, मोहिदा त.ह., अलखेड, चिखली, कानडी, पाडळदा आणि म्हसावद या सात गावांमध्ये एकाच वेळी भव्य शेतकरी मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये महाविद्यालयातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक आणि अंतिम वर्षाच्या 'रावे' (RAWE) अंतर्गत कार्य करणाऱ्या कृषी दूत व कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व, माती तपासणी व जमिनीची सुपीकता सुधारणे याविषयी सखोल व तांत्रिक मार्गदर्शन केले.
शहरालगतच्या ग्रामीण भागात खालीलप्रमाणे विविध ठिकाणी हे मेळावे संपन्न झाले. तिखोरा येथील त्रिंबकेश्वर महादेव मंदिरात प्रा. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. अलखेड येथील श्रीराम मंदिरात प्रा. कृणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. चिखली व कानडी येथील समाज गृहात डॉ. सचिन चौधरी यांनी संवाद साधला. पाडळदा येथे मुरली मनोहर मंदिरात प्रा. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. मोहिदा त.ह. येथील श्रीकृष्ण मंदिरात प्रा. विजय सपकाळ यांनी तांत्रिक माहिती दिली. म्हसावद येथील धनगर मढी परिसरात डॉ. भरत चौधरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
या मेळाव्यां दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विशेष कृषी प्रदर्शनाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे आणि पीक पद्धती जाणून घेतल्या.महाविद्यालयाने थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी कमालीचे समाधान व्यक्त केले. हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

