बनावट लेटरहेड, बनावट सही आणि 9 कोटींचा घोटाळा; नंदुरबारमध्ये माजी आमदाराच्या अडचणीत वाढ

बनावट लेटरहेड, बनावट सही आणि 9 कोटींचा घोटाळा; नंदुरबारमध्ये माजी आमदाराच्या अडचणीत वाढ

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

नंदुरबार : नंदुरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी करून शासनाने मंजूर केलेला तब्बल 9 कोटी रुपयांचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वळवल्याप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार डॉ. गावीत यांच्या नंदुरबार शहर भाजपा कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरनं 665/2026, भा.न्या.सं. 2023 चे कलम 61, 318(2), 318(4), 336(2), 336(3), 336(4), 337, 339, 340 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*काय आहे नेमके प्रकरण- आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी आदिवासी विकास मंत्री असताना 2022 ते 2024 या काळात नंदुरबार नगरपरिषद क्षेत्रातील विविध समाजाच्या सभागृह आणि मंदिरांच्या विकासासाठी शासनाकडे शिफारस करून मोठा निधी मंजूर करून आणला होता. शासन निर्णय दि. 19 जानेवारी 2024 अन्वये 5 कामांसाठी 10 कोटी शासन निर्णय दि. 21 जून 2024 अन्वये 10 कामांसाठी 15 कोटी
शासन निर्णय दि. 23 ऑगस्ट 2024 अन्वये 12 कामांसाठी 9.50 कोटी असा एकूण 34.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. 

आमदार गावीत मध्यंतरीच्या काळात आजारी असताना याचा फायदा घेत माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी (सर्व रा. नंदुरबार), अकाउंटंट किशोर तुळशीराम पाटील (रा. रनाळे) व इतर अज्ञात इसमांनी कट रचल्याचा आरोप आहे.

श्री. बिहार यांच्या तक्रारीनुसार, दि. 18 ऑगस्ट 2025 ते 2 एप्रिल 2026 दरम्यान आरोपींनी नंदुरबार शहरातील शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात आमदार गावीत यांच्या नावाचे दि. 18 ऑगस्ट 2025, 15 नोव्हेंबर 2025 आणि 5 जानेवारी 2026 रोजीचे 2 असे एकूण 4 बनावट लेटरहेड तयार केले. त्यावर बनावट सही करून ते मंत्रालयात सादर केले आणि मूळ तीन शासन निर्णयांमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे बदल करून 9 कोटी रुपयांचा निधी वेगळ्याच कामांसाठी वर्ग करून घेतला.

धक्कादायक बाब म्हणजे, वर्ग करण्यात आलेल्या निधीपैकी 2 कोटी रुपयांची कामे ही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे वडील कै. हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान व सभागृहासाठी प्रस्तावित केल्याचे उघड झाले आहे. हा संपूर्ण प्रकार स्वतःच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी शासनाची दिशाभूल करून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

*आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर यापूर्वीच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे साथीदार गौरव चौधरी व नयन चौधरी यांच्यावरही अशाच प्रकारचे गुन्हे असून नयन चौधरी याला यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार देखील करण्यात आले होते.

या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील करीत असून सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post