शहादा शहरातील वारंवार होणारा ब्लॅकआऊट: वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा पंचनामा..*

*शहादा शहरातील वारंवार होणारा ब्लॅकआऊट: वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा पंचनामा..*

(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील)

शहादा :   काल शहादा उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे शहराने तब्बल 10 ते 13 तासांचा भीषण ब्लॅकआऊट अनुभवला. ही काही पहिली वेळ नाही. दर उन्हाळ्यात हाच खेळ सुरू असतो आणि दरवेळी नागरिकांचा संतापाचा भडका उडतो. पण संताप व्यक्त करायचा कुणासमोर? कारण नागरिकांच्या रोषाला सामोरे जायला एकही अधिकारी फिरकला नाही. 

संपूर्ण भार एकट्या वायरमनवर! तोच खांबावर चढून दुरुस्ती करणार, तोच घामाघूम होऊन नागरिकांच्या शिव्या ऐकणार, आणि तोच कसेबसे उत्तर देणार. वरिष्ठ अधिकारी केबिनमध्ये बसून फक्त वीज आल्यावरच बोलायला मोकळे होतात.

*अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा हाच खरा फॉल्ट:*
खरा प्रश्न असा आहे की, फॉल्ट नेमका काय झाला? तो दुरुस्त करायला किती वेळ लागणार? यात काय अडचणी आहेत? हे जर अधिकाऱ्यांनी स्वतःहून, वेळेत नागरिकांना सांगितले असते, तर शहादेकरांनी नक्कीच संयम ठेवला असता. पण इथे संवादच नाही. पारदर्शकता शून्य. आणि उत्तरदायित्व? ते तर शोधूनही सापडणार नाही. वीज आल्यावर कंठ फुटणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकआऊटमध्ये मात्र मुकेपणा येतो, हे शहाद्याचे दुर्दैव.

*अल्पशिक्षित नागरिकाचे डोळे उघडणारे उदाहरण:*
एका अल्पशिक्षित नागरिकाने वीज कंपनीचा कारभार अचूक हेरला. तो म्हणाला, "गाडी घेतो आपण. काही लोकांच्या गाड्या 15 वर्षे बिनबिघाड चालतात. काहींच्या दोन वर्षातच रस्त्यात बंद पडतात. फरक काय? जो वेळेवर सर्व्हिसिंग करतो, गरजेनुसार वेळीच स्पेअर पार्ट बदलतो, त्याची गाडी धोका देत नाही. पण जो फक्त गाडी वापरतो, देखभालीकडे ढुंकूनही पाहत नाही, त्याची गाडी कुठेही, केव्हाही बंद पडणारच." 

हीच गत शहादा वीज वितरण कंपनीची झाली आहे. घरातल्या इन्व्हर्टरची बॅटरी पाणी न घातल्याने 'फुस' होते, तसेच या कंपनीचे झाले आहे. देखभाल शून्य, नियोजन शून्य, फक्त बिलवसुली शंभर टक्के.

*बदल्यांचा खेळ आणि जीर्ण झालेली यंत्रणा:*
इथे अधिकाऱ्यांच्या बदल्या वेळेवर होतात. काम करणाऱ्या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या वायरमनची तक्रार नसतानाही तडकाफडकी बदली होते. पण हीच तत्परता विद्युत यंत्रणा बदलताना कुठे जाते? 

शहरात जागोजागी रोज फॉल्ट होणे हे आता शहादेकरांच्या 'नशिबाला' आले आहे. कारण जीर्ण झालेल्या वायरी, उघड्यावरचे DP बॉक्स, गंजलेले मेन स्विच, आणि उपकेंद्रातील ब्रिटिशकालीन मशिनरी बदलायला कोणालाच वेळ नाही. या मशिनरीचे वेळेवर ऑडिट, देखभाल आणि पार्ट्स बदलले असते, तर आज ही वेळ आली नसती. पण इथे फक्त कागदोपत्री कामे होतात आणि नागरिक वेठीस धरले जातात. हा निव्वळ हेतुपुरस्सर हलगर्जीपणा आहे.

*मीटर रीडिंगचा घोटाळा आणि ठेकेदारांचे साटेलोटे:*
मीटर रीडिंगचा तर बाजारच मांडला आहे. ठेकेदार महिनोन्महिने रीडिंग घेत नाहीत. मग 'फॉल्टी मीटर' किंवा 'रीडिंग उपलब्ध नाही' या गोंडस नावाखाली अंदाजे बिलांचा डोंगर नागरिकांच्या माथी मारला जातो. तक्रारी करूनही एकाही ठेकेदारावर कारवाई नाही. त्यामुळे कंपनी आणि ठेकेदारांचे साटेलोटे आहे, अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. ग्राहकांना लुटायचा हा परवानाच दिलाय का?

*सोलर ग्राहकांची तर दुप्पट लूट:*
लाखो रुपये खर्च करून सोलर बसवणाऱ्या ग्राहकांची तर वेगळीच व्यथा आहे. दिवसाढवळ्या रोज 2-3 तास वीज या-ना त्या निमित्ताने गायब असते. सोलरमधून वीज तयार होत असली तरी, वीज पुरवठा खंडित झाला तर ती घरात वापरताही येत नाही आणि ग्रीडलाही पाठवता येत नाही. पूर्ण वीज वाया जाते. त्यामुळे सोलर असूनही एका सोलर ग्राहकाचे रोज 5-6 युनिट वीज वाया जात आहे. याला जबाबदार कोण? फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनी.

*आता तरी जागे व्हा, नाहीतर...*
वायरमनच्या खांद्यावर बंदूक ठेवणे बंद करा: कनिष्ठ नव्हे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समोर येऊन उत्तर द्यायला हवे. खंडित वीजपुरवठ्याची खरी माहिती, दुरुस्तीचा कालावधी आणि बदललेल्या पार्ट्सची यादी सोशल मीडियावरून जाहीर करा. पारदर्शकता आणली तरच रोष कमी होईल.
*DP बॉक्सला कुलूप लावा:* प्रत्येक DP स्विच बोर्डच्या बॉक्सला कुलूप लावून चावी फक्त अधिकृत वायरमनकडेच ठेवा. वीज चोरी करणारे, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा. कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे की, यामुळेच फॉल्टचे प्रमाण वाढले आहे.
*जबाबदारी निश्चित करा:* ठेकेदारांवर कारवाई होत नसेल, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. 

*शहादेकर आता सहन करणार नाहीत:* वीज ही भीक नाही, आमचा घटनादत्त हक्क आहे. वीज हे नशिबाने नाही, तर हक्काने मिळते. आणि हक्कासाठी लढावे लागले, तर शहादेकर रस्त्यावर उतरतील, हे विसरू नका.
*प्रा. डी. सी. पाटील,* 
*जिल्हा अध्यक्ष,*
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत,*
*नंदुरबार*
Previous Post Next Post