चव्हाणवाडी येथील जीर्ण शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

चव्हाणवाडी येथील जीर्ण शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.

(माहेमूद पिंजारी 
तालुका प्रतिनिधी देगलूर )

देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव अंतर्गत चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा इमारतीस मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुरेखा विशाल पवार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून छताचीही अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसाळ्यात छताला गळती लागत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  चव्हाणवाडी परिसरातील अनेक लहान मुले या शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून शाळा इमारतीची दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी देऊन कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ड. सुरेखा विशाल पवार यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेतली नाही आणि भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील. या निवेदनामुळे चव्हाणवाडी येथील शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालक व ग्रामस्थांनीही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
Previous Post Next Post