आभाळ भरूनही पाऊस नाही.देगलूर तालुक्यात खरीप पिकांवर संकटाचे सावट.

आभाळ भरूनही पाऊस नाही.

देगलूर तालुक्यात खरीप पिकांवर संकटाचे सावट.

( माहेमूद पिंजारी 
 तालुका प्रतिनिधी देगलूर)

देगलूर : देगलूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पुन्हा एकदा पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकरी गंभीर चिंतेत सापडला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असून,
शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वीस ते तीस वर्षांपूर्वी मराठवाड्यात पावसाळ्यात नियमित आणि सातत्याने पाऊस पडत असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी
दीर्घकाळ पावसाचा खंड, अशा लहरी पिकांसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर खरीप पेरणीनंतर शेतशिवार वरवर हिरवेगार दिसत असले, तरी दमदार पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. अनेक विहिरी व कूपनलिकांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून, काही ठिकाणी पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. त्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर देगलूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. आता बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, लवकरच समाधानकारक पाऊस पडावा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
हवामानामुळे शेतीचे नियोजनच विस्कळीत होत आहे. यंदाही त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र देगलूर तालुक्यात दिसून येत आहे.तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पावसामुळे पिकांची उगवण झाली असली, तरी त्यानंतर पाऊस न झाल्याने रोपांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडू लागली असून, जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. ९० दिवसांत तयार होणाऱ्या मूग व उडीद पिकांनाही याचा मोठा फटका बसत असून, वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापूस पिकालाही पाण्याअभावी फुलोरा व वाढीच्या टप्प्यावर अडचणी निर्माण झाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत असली, तरी जोरदार वाऱ्यांमुळे ढग विरून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पुन्हा मावळत आहेत. दररोज आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.हवामान विभागाने २० जुलैपर्यंत मराठवाड्यात अनेक भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची धास्ती अधिक वाढली आहे. वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याबरोबरच आर्थिक फटका बसण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सध्या राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. या असमतोल पावसामुळे शेतीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post