*लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा*
*विवाहास नकारानंतर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक, कर्मचारी सुटीवर जाऊन बेपत्ता*
( मीडीया पोलीस टाईम अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान)
बाळापूर : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्यावर घरमालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाचे आश्वासन देऊन संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारा पोलिस कर्मचारी पवन वडगावे याने त्यांच्या मुलीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. त्या विश्वासावर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही काळानंतर संबंधित तरुणीने विवाहाचा आग्रह धरल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली गेली. नैराश्याच्या भरात तिने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी वेळीच धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याचा पळ
या प्रकरणाची कुणकुण लागताच संबंधित पोलिस कर्मचारी दोन-तीन दिवसांपूर्वी रजेवर गेला आणि त्यानंतर बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, नातेवाईक व परिचितांकडे चौकशी सुरू आहे. आरोपीला लवकरच ताब्यात घेण्याच्या हालचाली पोलिसांनी वेगाने सुरू केल्या आहेत.
पोलिस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यावरच अशा स्वरूपाचे गंभीर आरोप झाल्याने बाळापूरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अलीकडील काळात पोलिस कर्मचाऱ्यांशी संबंधित काही वादग्रस्त प्रकरणे समोर आल्याने पोलिस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, या प्रकरणात तपास पूर्ण होऊन न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांचे सत्य स्पष्ट होणार आहे.

