शाळेच्या पहिल्या दिवशी सुरक्षिततेचा पहिला धडा; प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांचा प्रेरणादायी उपक्रम*

*शाळेच्या पहिल्या दिवशी सुरक्षिततेचा पहिला धडा; प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांचा प्रेरणादायी उपक्रम* 

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान युसुफ खान)

अकोला : शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या स्वप्नांची, नव्या आशांची आणि ज्ञानयात्रेची सुरुवात. परंतु या ज्ञानप्रवासाइतकाच महत्त्वाचा असतो तो सुरक्षित प्रवास. याच विचाराला कृतीची जोड देत प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी     "सुरक्षीत विद्यार्थी वाहतूक ही जबाबदारी" या अभिनव उपक्रमाचे आयोजन पोदार स्कूल येथे करण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्कूल बस चालक व वाहक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, सिग्नलचे महत्त्व, रस्ता ओलांडताना घ्यावयाची दक्षता यांचे महत्त्व प्रत्यक्ष व्हिजन व्हॅन द्वारे उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप, मोटर वाहन निरीक्षक किरण लोने, मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे , चालक आंधळे, चालक महाले यांनी सहभाग घेतला. सदर वेळी मार्गदर्शन करताना स्कूल बसमधून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व विशेष अधोरेखित करण्यात आले. बस पूर्णपणे थांबल्यानंतरच चढणे-उतरणे, रांगेत शिस्तीने उभे राहणे, बसच्या पुढे किंवा मागे धावू नये, खिडकीबाहेर हात किंवा डोके काढू नये, चालक व शिक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, अशा जीवनरक्षक सूचना विद्यार्थ्यांना सोप्या आणि प्रभावी पद्धतीने देण्यात आल्या.
पालकांनाही मुलांसाठी आदर्श ठरण्याचे आवाहन करत, वाहतूक नियमांचे स्वतः पालन करण्याची आणि लहानपणापासूनच मुलांमध्ये रस्ता सुरक्षेचे संस्कार रुजविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. कारण रस्ता सुरक्षा हा केवळ नियमांचा विषय नसून प्रत्येक कुटुंबाच्या जबाबदारीचा आणि प्रत्येक नागरिकाच्या संस्कारांचा विषय आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देतानाच त्यांच्या मनात "सुरक्षित प्रवास हीच खरी जबाबदारी" ही भावना जागविण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. शिक्षणाबरोबरच जीवनमूल्ये आणि सुरक्षिततेचे संस्कार देणारा हा उपक्रम समाजात रस्ता सुरक्षा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
"ज्ञानाचा प्रवास तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास सुरक्षित असतो." या संदेशाने तसेच वाहतुक नियमांची पुस्तके वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post