अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा; धुळे एलसीबीच्या आरीफ पठाण यांचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव!
सोनगीर खूनप्रकरणाचा वेगवान तपास; उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान
(रावेर | शेख शरीफ महाराष्ट्र राज्य उपसंपादक)
सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गाजलेल्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत उत्कृष्ट तपासकार्य केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) धुळे येथील पोहेकॉ. आरीफ रमजान पठाण (बकल नं. १००४) यांना पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९ व ३५२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे व सोनगीर पोलीस ठाण्याचे संयुक्त विशेष पथक तयार करण्यात आले.
विशेष पथकाने सलग ४८ तास अथक तपास, गोपनीय माहिती संकलन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत दि. ८ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे पोहेकॉ. आरीफ रमजान पठाण यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्याचे कौतुक करत, भविष्यातही अशीच देशसेवा व जनसेवा करत राहण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या सन्मानामुळे धुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून आरीफ पठाण यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

