शेळगाव छत्रीच्या शेतकरी पुत्राची राष्ट्रीय पातळीवर झेप ब्रेल आधारित डिजिटल शिक्षण उपकरणाला भारत सरकारची डिझाइन नोंदणी

शेळगाव छत्रीच्या शेतकरी पुत्राची राष्ट्रीय पातळीवर झेप ब्रेल आधारित डिजिटल शिक्षण उपकरणाला भारत सरकारची डिझाइन नोंदणी

(मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )

नांदेड :नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री या छोट्याशा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र अविनाश विठ्ठलराव अनेराये यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि संशोधनाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी सहसंशोधकांसह विकसित केलेल्या "Braille Based Digital Learning Device" या नाविन्यपूर्ण उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाइन नोंदणी प्राप्त झाली आहे.ही डिझाइन क्रमांक 498426-001 अंतर्गत नोंदविण्यात आली असून, दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.शेळगाव छत्रीसारख्या छोट्याशा गावातून 
शिक्षणाचा प्रवास सुरू करून, विशेष शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या अविनाश अनेराये यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि नवकल्पनांच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण नायगाव तालुका, नांदेड जिल्हा आणि मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या डिझाइनचे सह-अर्जदार म्हणून डॉ. धनंजय विष्णू देशमुख, सुनील कुमार शिरपूरकर, डॉ. पूर्णिमा गुप्ता आणि प्रिया यांचाही सहभाग आहे.विशेष शिक्षण, दिव्यांग सक्षमीकरण आणि समावेशक शिक्षण क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे. "परिस्थिती नव्हे, तर जिद्द आणि मेहनत यशाचा मार्ग दाखवते," याची प्रचिती अविनाश अनेराये यांच्या कार्यातून पुन्हा एकदा आली आहे.
Previous Post Next Post