*हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांवर ज्येष्ठ पत्रकाराशी गैरवर्तनाचा आरोप; पत्रकार संघटनांमध्ये संताप, वर्धा जिला खासदार अमर काळे यांना निवेदन*
आज दिनांक.10/7/2026 ला सकाळी 10, वाजता निवेदन देण्यात आले
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत हिंगणघाट तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने खासदार अमरभाऊ काळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, दि. ५ जुलै २०२६ रोजी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त हिंगणघाट पोलीस ठाण्यात गेले होते. आरोपानुसार, त्यांनी ठाणेदारांच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घेतली होती. त्यावेळी काही नागरिक अतिक्रमणाच्या विषयावर ठाणेदार अनिल राऊत यांच्याशी चर्चा करत होते. चर्चा संपण्याची प्रतीक्षा करत असताना अब्बास खान यांनी स्वाक्षरीसाठी आपले पत्र ठाणेदारांना दिले. त्याचवेळी ठाणेदारांनी अचानक त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या वेळी दालनात उपस्थित असलेल्या नागरिकांनी संपूर्ण प्रकार प्रत्यक्ष पाहिला व ऐकला असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
पत्रकार संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही पहिलीच घटना नसून ठाणेदार अनिल राऊत यांच्या कार्यकाळात अनेक सर्वसामान्य नागरिक, लहान व्यावसायिक तसेच तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशीही कठोर आणि अपमानास्पद वर्तन झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नागरिकांशी कथितपणे "सिंघम स्टाईल"मध्ये बोलले जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, शहरातील काही समाजसेवक आणि नागरिकांनी ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अवैध व्यवसायांशी संबंधित काही व्यक्तींप्रती त्यांची भूमिका मवाळ असल्याची तसेच अशा व्यक्तींशी त्यांचे निकटचे संबंध असल्याची शहरात चर्चा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून त्यांचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती पत्रकार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार अनिल राऊत यांनी, "समोर पत्रकार आहेत हे मला माहिती नव्हते," असे कथितपणे सांगितले. यावर संघटनेने प्रश्न उपस्थित करत, "जर समोर पत्रकार नसून एखादा सर्वसामान्य नागरिक असता, तर त्याच्या सन्मानाला काहीच किंमत नसती का?" असा सवाल केला आहे. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक समान असून सर्वांशी सन्मानपूर्वक वागणे ही प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
हिंगणघाट तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी अब्दुल कदीर बख्श, करीम खान, मक़सूद बावा, मोहसिन खान, जावेद पाशा, प्रज्योत लिहितकर, मेघराज मुन, सलीम पाशा, सैय्यद ज़ाकिर अली, फैमोद्दीन शेख, राहुल दारुणकर, खासदार यांनी अमरभाऊ काळे यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात कोणत्याही पत्रकार किंवा सर्वसामान्य नागरिकासोबत अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

